वृत्तसंस्था, कराची/दुबई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकेकाळी पाकिस्तानच्या संघाने जागतिक हॉकीवर वर्चस्व गाजवले होते. मात्र आता पाकिस्तान हॉकीचे अस्तित्वच जवळपास संपुष्टात आले आहे. इतकीच वाईट परिस्थिती आता पाकिस्तान क्रिकेट संघाचीही झाली आहे. हे चित्र बदलले नाही, तर पाकिस्तानातील क्रिकेट हॉकीपेक्षाही रसातळाला जाईल, अशी बोचरी टिप्पणी पाकिस्तानचा माजी सलामीवीर अहमद शहजादने एका कार्यक्रमात केली. पाकिस्तान क्रिकेट मंडळावर (पीसीबी) अगदी उघडपणे टीका करणाऱ्या शहजादने या वेळी केलेले वक्तव्य ‘पीसीबी’ला विचार करायला लावणारे आहे.

तब्बल २९ वर्षांनंतर पाकिस्तानला ‘आयसीसी’च्या एखाद्या जागतिक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी लाभली. मात्र, चॅम्पियन्स करंडक स्पर्धेला सुरुवात होऊन आठवडाही झाला नाही, तोच यजमानांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. प्रथम न्यूझीलंड, मग पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताकडून पाकिस्तानला हार पत्करावी लागली. घरच्या मैदानांवरील या स्पर्धेत बाद फेरीही गाठता न येणे, हे पाकिस्तान संघाचे अपयश पचवणे माजी खेळाडूंना अवघड जात आहे. वसीम अक्रम, वकार युनिसपासून ते शोएब मलिक, मोहम्मद हफीज यांसारख्या नामांकित माजी खेळाडूंनी पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर ताशेरे ओढले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान क्रिकेटची झपाट्याने अधोगती झाली आहे. गेल्या तीन वर्षांत २६ निवडकर्ते, चार कर्णधार आणि आठ प्रशिक्षक असे बदल पाकिस्तान क्रिकेटने पाहिले. सततच्या या प्रयोगांचा पाकिस्तानला मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे. बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह यांसारखे काही खेळाडू सातत्याने या संघाचा भाग आहेत. मात्र, त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येत आहे. तसेच पाकिस्तानच्या संघनिवडीवरही बरीच टीका झाली. ‘‘चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात एक फिरकीपटू आणि एक सलामीवीर कमी असल्याचे आपल्याला समजते, पण हे निवड समितीला कळले नाही,’’ असे वसीम अक्रम आणि मोहम्मद हफीज वेगवेगळ्या कार्यक्रमांत म्हणाले.

भारताला एकदिवसीय विश्वचषक जिंकवून देणाऱ्या गॅरी कर्स्टन यांची गतवर्षी पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती. मात्र, संघनिवडीवरून मतभेद आणि अन्य काही कारणांमुळे त्यांनी एकाही एकदिवसीय सामन्यात प्रशिक्षण देण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. माजी वेगवान गोलंदाज अकिब जावेदने प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली. मात्र, पाकिस्तान संघाची कामगिरी निराशाजनकच राहिली.

तूर्तास बदल नाही…

याआधी पाकिस्तानच्या संघाला २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात, तर गतवर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातही साखळी फेरीचा अडथळा पार करता आला नव्हता. आता चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतही अपयश आल्याने ‘पीसीबी’ नाराज असल्याचे समजते. मात्र, पाकिस्तानकडे या स्पर्धेचे यजमानपद असल्याने पूर्ण स्पर्धा संपत नाही, तोवर संघ व्यवस्थापनात कोणतेही बदल केले जाणार नसल्याचे समजते. ‘‘सध्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे यजमानपद यशस्वीरीत्या भूषवणे हे ‘पीसीबी’चे लक्ष्य आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाच्या कामगिरीबाबत इतक्याच कोणतीही चर्चा केली जाणार नाही,’’ असे ‘पीसीबी’तील सूत्रांनी सांगितले. अकिब जावेद यांचा करार २७ फेब्रुवारीला संपुष्टात येणार आहे. पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडमध्ये १५ मार्चपासून मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे या दौऱ्यासाठी अंतरिम प्रशिक्षकाची निवड अपेक्षित असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.