IND vs NZ Washington Sundar Name Mystery: वॉशिंग्टन सुंदरने पुणे कसोटीत आपल्या फिरकीच्या जोरावर किवी संघाला चांगलाच धक्का दिला. पुण्यात सुरू असलेल्या भारत-न्यूझीलंडविरूद्ध दुसऱ्या कसोटीपूर्वी बीसीसीआयने संघात मोठ बदल करत वॉशिंग्टन सुंदरला सामील केले. वॉशिंग्टनला २०२१ नंतर कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. सुंदरने या संधीचं सोनं करत पहिल्या डावात ७ विकेट्स घेत जबरदस्त कामगिरी केली. यानंतर वॉशिंग्टनने दुसऱ्या डावातही ४ विकेट्स घेत आपल्या भेदक गोलंदाजीचा प्रत्यय दिला आहे.
वॉशिंग्टन सुंदर हा मूळचा तमिळनाडूचा आहे. पण मग त्याचं नाव वॉशिंग्टन असं का आहे, त्याच्या नावामागची नेमकी कहाणी काय आहे, हे जाणून घेऊया. त्याचं नावं वॉशिग्टन का ठेवण्यात आले याबद्दलचा किस्सा त्याच्या वडिलांनीच काही वर्षांपूर्वी ‘द हिंदू’ या वृत्तपत्राला दिलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये सांगितला होता.
हिंदू कुटुंबात जन्म तरी नाव वॉशिंग्टन का ठेवलं?
भारतीय असूनही इंग्रजी व्यक्तीप्रमाणे मुलाला दिलेल्या नावाबद्दल सुंदर म्हणाले की, मी हिंदू असून, आमचे कुटुंब अगदी साधे आहे. ट्रिप्लिकेनमध्ये (आत्ताचे थिरुवल्लीकेनी) आमच्या घरापासून दोन गल्ल्या सोडून सैन्यातून निवृत्त झालेले पी. डी. वॉशिंग्टन नावाचे एक गृहस्थ राहत होते. ते क्रिकेटचे मोठे चाहते होते. आम्ही क्रिकेट खेळायला जायचो तेव्हा ते मरिना मैदानावर आमचा खेळ पाहण्यासाठी यायचे. ते स्वत: एक उत्तम क्रिकेटपटू होते. आमच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. म्हणून माझ्या खेळाच्या प्रेमात पडलेल्या या गृहस्थांनी मला शाळेचा गणवेश घेऊन दिला, माझ्या शाळेची फी भरली तसेच पुस्तके दिल्याच्या आठवणी सुंदर यांनी या मुलाखतीमध्ये सांगितल्या. केवळ आर्थिक मदत नाही तर वॉशिंग्टन हे मला सायकलीवरुन मैदानावर घेऊन जायचे. तसेच सतत मला प्रेरणा देत राहायचे असेही सुंदर यांनी सांगितले.
हेही वाचा – IND vs NZ: विराट कोहली आणि टीम साऊदी खरंच एकमेकांशी भांडत होते का? अंपायरसमोरचा ‘तो’ VIDEO व्हायरल
सुंदर यांनी रणजी संघात स्थान मिळवल्यानंतर वॉशिंग्टन खूप खूश झाले होते. त्यांना आपल्यामुळे आंनद झाल्याचे पाहून मला बरे वाटायचे. कारण त्यांनी माझ्यासाठी बरेच कष्ट घेतलेले आणि त्यामुळेच ते माझ्यासाठी खूप काही होते. मात्र दुर्देवाने माझ्या पहिल्या मुलाच्या जन्मापूर्वीच त्यांचे निधन झाले. माझ्या पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी अनेक वैद्यकीय अडचणी आल्या. मात्र माझा मुलगा वाचला.
आमच्याकडील प्रथेप्रमाणे त्याच्या नामकरणाच्या वेळी मी बाळाच्या कानात श्रीनिवास हे नाव बोललो आणि त्याचे नाव श्रीनिवास ठेवले. मात्र मी आधीपासून ठरवलेले त्याप्रमाणे माझ्या पहिल्या मुलाला मी वॉशिंग्टन यांचे नाव दिले. माझ्यासाठी इतकं काही करणारी व्यक्ती कायम लक्षात राहावी म्हणून मी माझ्या मुलाचे नाव वॉशिंग्टन ठेवले. मला दुसरा मुलगा झाला असता तर मी त्यालाही वॉशिंग्टन ज्युनियर नावानेच हाक मारली असती, असंही वॉशिग्टन सुंदरचे वडील या मुलाखतीच्या शेवटी म्हणाले. वॉशिग्टन सुंदरचा जन्म ५ ऑक्टोबर १९९९ चा आहे.
i
© IE Online Media Services (P) Ltd