Shoaib Malik reacts to Team India victory: सध्या सुरु असलेल्या आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताने दिमाखदार कामगिरी केली आहे. साखळी फेरीत आतापर्यंत खेळलेले सर्व आठच्या आठ सामने टीम इंडियाने एकहाती जिंकले आहेत. एकूण १६ गुणांसह, मेन इन ब्लू गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे. जेव्हा सर्व साखळी सामने संपतील तेव्हा देखील भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर असेल याची खात्री सर्वांना वाटत आहे. अशा स्थितीत भारतीय संघाचा विजयी अश्वमेध रोखायचा कसा, याची चिंता प्रत्येक विरोधी संघाला सतावत आहे. दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने भारताला रोखण्याचा एक मजेशीर मार्ग सांगितला आहे.
रविवारी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला टीम इंडियाने २४३ धावांनी मात देत शानदार विजय संपादन केला आहे. ५० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात एकूण ३२६ धावा केल्यानंतर भारताने २७.१ षटकांत केवळ ८३ धावांत दक्षिण आफ्रिकेला गारद केले. भारताकडून विराट कोहलीने १२१ चेंडूत १०१ धावा करत सर्वाधिक धावा केल्या. त्याला श्रेयस अय्यरने ७७ धावा करत चांगली साथ दिली होती.
जडेजाने गोलंदाजीत कमाल केली
भारताच्या क्रमांक ३ आणि ४च्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. दुसऱ्या डावात गोलंदाजाची अप्रतिम गोलंदाजी करण्याची पाळी होती. रविवारी भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करण्याची रवींद्र जडेजाची पाळी होती. ३४ वर्षीय फिरकीपटूने नऊ षटकांत केवळ ३३ धावांत दक्षिण आफ्रिकेच्या पाच फलंदाजांना बाद केले. दक्षिण आफ्रिकेवर २४३ धावांनी विजय हा भारताचा एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील तिसरा आणि स्पर्धेच्या इतिहासातील एकूण आठवा विजय होता.
हेही वाचा: BAN vs SL: शाकिबच्या विधानावर अँजेलो मॅथ्यूजने केली सडकून टीका; म्हणाला, “मी कधीच त्याचा आदर…”
भारताला रोखायचे कसे?
भारताने दक्षिण आफ्रिकेला विक्रमी फरकाने पराभूत केल्यानंतर, माजी पाकिस्तानी कर्णधार वसीम अक्रम, शोएब मलिक, मोईन खान आणि मिसबाह-उल-हक यांना विचारण्यात आले की, टीम इंडियाला २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोखण्याचा काही मार्ग आहे का? यावर मलिकने ‘ए’ स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात या प्रश्नाचे तीन शब्दांत मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला की, “तुम्ही टी.व्ही. बंद करून टाका अन् त्यांना विश्वचषक देऊन टाका.”
भारताने आधीच विजयाची तयारी केली आहे – वसीम अक्रम
महान वेगवान गोलंदाज अक्रमने या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, “विश्वचषकातील प्रत्येक संघ यावेळी नेमका हाच विचार करत आहे. यामध्ये न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, थोड्याफार प्रमाणात पाकिस्तान यांचा समावेश आहे. काहीही झाले तरी उपांत्य फेरीत त्यांच्याशी खेळू पण त्यांना हरवू शकू का? यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहे. ते खरोखरचं जबरदस्त खेळत आहेत. विश्वचषक जिंकण्याची योजना त्यांनी अनेक वर्षांपासून योजली होती.”