भारतीय क्रिकेटमध्ये ड्रेसिंग रूमच्या अनेक आठवणी आहेत, ज्या खूप अविस्मरणीय आहेत. या ड्रेसिंग रूममध्ये नवीन चेहरे येतात आणि कालांतराने गायब होतात. तसेच खेळाडूंच्या आयुष्याशी निगडित अशा अनेक खास गोष्टी ड्रेसिंग रूमशी निगडीत असतात. पण १७ एप्रिल १९८६ रोजी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये जे घडले ते सर्वात संस्मरणीय आहे.
आशिया कप १९८७ मध्ये दुबईच्या शारजाह स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान फायनल सामना खेळला गेला होता. या सामन्याच्या एक दिवस आधीची ही घटना आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने भारतीय ड्रेसिंग रुममध्ये येऊन भारतीय खेळाडूंना ऑफर दिली, मात्र कपिल देव ड्रेसिंग रुममध्ये दाखल होताच, त्यांनी दाऊद इब्राहिमला बाहेरचा रस्ता दाखवला. भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी या घटनेचा उल्लेख फार पूर्वी एका कार्यक्रमादरम्यान केला होता. कपिल देव यांनीही नंतर या घटनेला दुजोरा दिला होता.
दिलीप वेंगसरकर यांच्या म्हणण्यानुसार, मॅचपूर्वी दाऊद इब्राहिम आमच्या ड्रेसिंग रूममध्ये आला होता. बॉलीवूडचा कॉमेडियन मेहमूदही त्याच्यासोबत होता. दाऊद ड्रेसिंग रूममध्ये आला आणि खेळाडूंना म्हणाला की उद्याच्या सामन्यात पाकिस्तानला हरवले तर प्रत्येक खेळाडूला टोयोटा कार देईन. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेनंतर, जेव्हा भारतीय कर्णधार कपिल देव ड्रेसिंग रूममध्ये आला. तेव्हा सर्व क्रिकेटपटू एकमेकांकडे पाहत होते. कपिल देव ड्रेसिंग रूममध्ये आले आणि म्हणाले की मला खेळाडूंशी बोलायचे आहे. त्यामुळे तुम्ही ड्रेसिंग रुममधून बाहेर जा.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत कपिल देव म्हणाले होते, “होय, मला आठवते की शारजाहमधील एका सामन्यादरम्यान एक गृहस्थ आमच्या ड्रेसिंग रूममध्ये आले होते आणि त्यांना खेळाडूंशी बोलायचे होते. परंतु मी त्यांना ताबडतोब ड्रेसिंग रूममधून बाहेर पडण्यास सांगितले. कारण बाहेरील लोकांना आता येण्याची परवानगी नव्हती. त्यानंतर दाऊद आणि त्याचा साथीदार बाहेर गेले. त्यानंतर कोणीतरी मला सांगितले की तो बॉम्बेचा स्मगलर आहे आणि त्याचे नाव दाऊद इब्राहिम आहे. याआधी असे काही घडले नव्हते.”
कपिल देव म्हणाले होते की, खेळाडूंना टोयोटा कार ऑफर केल्या जात असल्याची माहिती नव्हती. ते म्हणाले, “माझ्या माहितीनुसार असा कोणताही प्रस्ताव तेव्हा आला नव्हता. दिलीप आता म्हणत असेल तर त्याला माझ्यापेक्षा जास्त माहिती असावी. जळगावातील एका कार्यक्रमात वेंगसरकर म्हणाले होते, “दाऊद म्हणाला होता की, जर तुम्ही स्पर्धा जिंकली तर मी तुम्हा प्रत्येकाला टोयोटा कार देईन. ही ऑफर संघाने नाकारली होती.”
बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांनीही त्यांच्या ‘आय वॉज देअर – मेमोयर्स ऑफ अ क्रिकेट अॅडमिनिस्ट्रेटर’ या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला आहे. टोयोटा कारच्या ऑफरबद्दल त्यांनी लिहिले आहे की, “जर भारतीय संघ येथे चॅम्पियन बनला, तर मी भारतातील अधिकाऱ्यांसह संघातील प्रत्येक सदस्याला त्यांच्या दारात टोयोटा कार सादर करीन, असे दाऊद म्हणाला होता.”