आयपीएलचा हा अकरावा हंगाम असून 2008 मध्ये जेव्हा आयपीएल सुरू झालं तेव्हा पहिला सामना आज म्हणजे 18 एप्रिल रोजी खेळवण्यात आला होता. विशेष म्हणजे या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाइट रायडरकडून खेळताना ब्रँडन मॅक्युलमनं 73 चेंडूंमध्ये 158 धावा फटकावल्या आणि बंगळुरूच्या गोलंदाजांच्या चिंध्या उडवल्या.

शाहरूखच्या कोलकाता संघानं तब्बल 140 धावांनी तो सामना जिंकला होता. त्यातही गमतीचा भाग म्हणजे यंदा मॅक्युलम बंगळुरूच्या संघात आहे. मॅक्युलमनं त्यावेळी केलेला सर्वाधिक धावांचा विक्रम नंतर 2013 मध्ये 66 चेंडूंमध्ये 175 धावा करत तोडला. या 158 धावांच्या खेळीमध्ये मॅक्युलमनं 16 षटकार व 14 चौकार लगावले होते. त्यातही योगायोगाचा भाग म्हणजे आजपर्यंत कोलकाता संघाकडून फटकावण्यात आलेलं ते एकमेव शतक आहे. कोलकाता संघाकडून आयपीएलमध्ये शतक झळकावण्यात फक्त मॅक्युलम यशस्वी झाला आहे.

रविवारी कोलकाता व बंगळुरू सामन्या बंगळुरूतर्फे खेळणाऱ्या मॅक्युलमनं टी-20 क्रिकेटमधला 9000 धावांचा टप्पा पार केला आहे. असी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज आहे. या सामन्यात मॅक्युलमनं 27चेंडूंमध्ये 43 धावा केल्या. टी-20 मध्ये 9000 धावा करणारा पहिला फलंदाज वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आहे. गेलनं 323 सामन्यांमध्ये 11068 धावा केल्या आहेत.