बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने भाजपा उमेदवार गायत्री सिद्धेश्वर यांच्यावर काँग्रेस नेत्याने केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे. काँग्रेस नेते शमनूर शिवशंकरप्पा यांनी केलेलं वक्तव्य महिला विरोधी असल्याचं सायनाने म्हटलं आहे. दावणगेरे दक्षिणचे आमदार शिवशंकरप्पा यांनी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार सिद्धेश्वर यांच्या पत्नीला फक्त स्वयंपाक करता येतो असं वक्तव्य केलं. यानंतर सायनाने एक्स पोस्ट करत यावर टीका केली आहे.
सायनाने काय म्हटलं आहे?
कर्नाटकचे एक आघाडीचे नेते शिवशंकरप्पा यांनी म्हटलंय महिलांनी स्वयंपाकघरापर्यंतच सीमित राहिलं पाहिजे. दावणगेरेच्या उमेदवार गायत्री सिद्धेश्वर यांच्यावर केलेली टीका ही एखाद्या लैंगिक टिप्पणी पेक्षा कमी नाही. लडकी हूँ लड सकती हूँ म्हणणाऱ्या पक्षाकडून तरी अशी अपेक्षा नाही. या आशयाची पोस्ट सायनाने केली आहे.
लंडन ऑलिपिंक २०१२ मध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या ३४ वर्षीय नेहवालने म्हटलं आहे की देशातल्या महिला प्रत्येक क्षेत्रात चांगली प्रगती करत आहेत. त्यांच्याविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करणं हे क्लेशदायक आहे.
काँग्रेसला माझ्याकडून काय अपेक्षा?
सायनाने पुढे म्हटलं आहे, “मी जेव्हा खेळाच्या मैदानावर भारतासाठी पदकं जिंकले त्यावेळी माझ्याकडून काँग्रेसला काय अपेक्षा होती? मी काय करायला हवं होतं? अशा प्रकारची वक्तव्यं का केली जात आहेत? महिला आणि मुली कुठल्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत. अशा गोष्टी होत असताना महिलांवर अशी वक्तव्यं का केली जात आहेत?” असा प्रश्न सायना नेहवालने विचारला आहे.