फलंदाजांचा कस पाहणाऱया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांवर यंदाची विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. गेल्या चार वर्षात भारतीय संघात झालेले अमुलाग्र बदल आणि विजेतेपद कायम राखण्याचे आव्हान, या पार्श्वभूमीवर अंतिम पंधरा जणांचा भारतीय संघ कसा असेल? यासाठी loksatta.com वर विचारण्यात आलेल्या प्रश्नांना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
भारतीय क्रिकेट निमायम मंडळाने(बीसीसीआय) जाहीर केलेल्या ३० जणांच्या संभाव्य भारतीय संघात यंदा पूर्णपणे युवा खेळाडूंचा भरणा आहे. या सर्व खेळाडूंचे कौशल्य पाहता अंतिम पंधरा जणांचा संघ निवडताना बुधवारी ‘बीसीसीआय’च्या निवड समितीचा कस लागेल यात शंका नाही.
लोकसत्ताच्या संकेतस्थळावर देखील संघ निवडीसंदर्भातील सर्व पर्यायांमध्ये अटीतटीची लढत पहायला मिळाली. भक्कम धावसंख्या उभारताना संघाच्या फलंदाजीची चांगली सुरूवात करून देण्याची जबाबदारी सलामीवीरांवर असते.
सलामी जोडी कोण? या प्रश्नात शिखर धवन, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा या दोन जोड्यांमध्ये चुरस रंगली होती. यात वाचकांनी टीम इंडियाच्या सलामी जोडीसाठी शिखर धवन आणि रोहित शर्मा या जोडीलाच सर्वाधिक पसंती दर्शवली. तर, शिखर धवन, अजिंक्य रहाणे या जोडीलाही संमिश्र प्रतिसाद मिळाला.
संघातील मधल्या फळीतील खेळाडू संघाची खरी ताकद दाखवून देणारे असतात. दबावावेळी शांतपणे तर कधी गरज ओळखून आक्रमक खेळी साकारण्याची तयारी ठेवणे हे गुण मधल्या फळीतील खेळाडूंमध्ये असणे महत्त्वाचे. संघाच्या मधल्या फळीसाठी कर्णधार धोनी व्यतिरिक्त आणखी तीन खेळाडूंमध्ये सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा यांचा समावेश असण्यावर वाचकांनी भर दिल्याचे दिसले. तर, अंबाती रायुडूलाही मधल्या फळीतील खेळाडूसाठी चांगला प्रतिसाद मिळाला.
गोलंदाजीची बाजू पाहता वेगवान गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव या तिघांच्या बाजूने वाचकांचा कल राहिला तर, इशांत शर्मालाही अंतिम पंधरा जणांच्या संघासाठी वाचकांनी पसंती दिली.
विशेष म्हणजे, संघाच्या फिरकी गोलंदाजीची जबाबदारी आर.अश्विन सोबत युवा फिरकीपटू अक्षर पटेलच्या खांद्यावर सोपविण्याचा अनपेक्षित कौल वाचकांनी दिला. अश्विनच्या बरोबरीला आणखी एका फिरकी गोलंदाजासाठी रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल या दोघांमध्ये चुरशीची लढत पहायला मिळाली.
वाचकांच्या पसंतीनुसार, विश्वचषकासाठीच्या अंतिम पंधरा जणांच्या भारतीय संघासाठी महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), विराट कोहली, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, आर.अश्विन, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, अंबाती रायुडू, अमित मिश्रा यांचे संघातील स्थान पक्के असल्याचे दिसून आले.