IND vs SL, Asia Cup, Gautam Gambhir on MS Dhoni: आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीत भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. आता भारताचा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. मात्र, याआधी टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध सामना खेळायचा आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २१३ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १७२ धावांवर गारद झाला. गौतम गंभीरने एम.एस. धोनीचे कौतुक केले आणि रोहित शर्माबाबत मोठे विधानही केले. तसेच, “हा विजय माझ्यासाठी पाकिस्तानपेक्षाही मोठा आहे”,असे तो म्हणाला.
श्रीलंकेविरुद्धचा विजय हा पाकिस्तानपेक्षाही मोठा- गौतम गंभीर
आशिया चषक २०२३च्या सुपर-४ मधील तिसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेला १२ सप्टेंबर रोजी ४१ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. असे जरी असले, तरी भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने म्हटले आहे की, “श्रीलंकेविरुद्धचा विजय हा पाकिस्तानपेक्षाही मोठा आहे.” त्याने यामागील कारणही सांगितले आहे.
माजी सलामीवीर गंभीर म्हणाला, “माझ्या मते, या विजयामुळे भारतीय संघाला जास्त आत्मविश्वास मिळाला असेल.” स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गंभीर पुढे म्हणाला, “हा विजय माझ्यासाठी पाकिस्तानपेक्षाही मोठा होता. आपण पाकिस्तानविरुद्ध २२८ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. मात्र, या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास जास्त वाढला असेल. फलंदाजीबाबत संशय नव्हता कारण, खेळपट्टी तशीच होती. जसप्रीत बुमराह दुखापतीतून पुनरागमन करत होता. त्यामुळे त्याच्याविषयी थोडी मनात शंका होती. यानंतर कुलदीप यादव आणि बाकीचे सर्व गोलंदाज यांनी शानदार कामगिरी केली. या खेळपट्टीवर परिस्थिती पाहता २१३ धावसंख्येचा बचाव करणे नक्कीच कौतुकास्पद बाब आहे.”
एम.एस. धोनीविषयी गौतम गंभीर काय म्हणाला?
भारतीय संघाचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ४८ चेंडूत ५३ धावांची शानदार खेळी खेळली आणि यादरम्यान त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पाही पार केला. ही कामगिरी करणारा रोहित हा भारताचा सहावा आणि एकूण १५वा फलंदाज ठरला. मात्र, रोहित शर्माच्या कारकिर्दीची सुरुवात अत्यंत संथ आणि संघर्षाने भरलेली होती.
रोहित शर्मा हा २००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा चौथा सर्वात संथ भारतीय होता आणि त्यावेळी हा खेळाडू १०,००० धावा करेल आणि १०,००० वन डे धावा करणारा तो जगातील दुसरा सर्वात वेगवान भारतीय बनेल असे कोणालाही वाटले नव्हते. रोहितच्या कारकिर्दीत बदल झाला, जेव्हा एम.एस. धोनीने २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलामीला फलंदाजी करण्यास पाठिंबा दिला.
धोनीच्या या निर्णयाने रोहित शर्माचे नशीब बदलले आणि आज तो ज्या स्थानावर आहे ते त्याच्यामुळेच, हे कोणापासूनही लपलेले नाही. भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने पुन्हा एकदा मान्य केले आहे की, “आज रोहित शर्मा जो काही आहे तो धोनीमुळेच आहे,” असे गंभीरने म्हटले आहे. भारत-श्रीलंका सामन्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “रोहित शर्मा एम.एस. धोनीमुळे आज एवढा मोठा टप्पा गाठू शकला. सुरुवातीला त्याच्या संघर्षाच्या काळात एम.एस.ने त्याची साथ दिली.” असे म्हणत गंभीरने धोनी आणि रोहितचे तोंडभरून कौतुक केले.