India vs England, Cheteshwar Pujara: भारतीय कसोटी संघापासून दूर असलेल्या चेतेश्वर पुजाराने देशांतर्गत हंगामात धावा केल्यानंतर आगामी मालिकेत त्याच्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने पुजाराचा गेल्या काही दिवसांपासून संघात समावेश न केल्याबद्दल बीसीसीआय निवड समितीवर टीका केली आहे. कैफने पुजाराचा बचाव करताना म्हटले की, “निवडकर्ते जरी काहीही विचार करत असले तरी तो धावा करत राहतो. त्याच्या बाबतीत काय होते हे आगामी काळात आपल्या सर्वाना कळेलच.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे ही दोन नावे आहेत जी गेल्या वर्षी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताच्या अपयशानंतर भारतीय पांढऱ्या जर्सीत दिसली नाहीत. अलीकडेच पुजाराने रणजी ट्रॉफीमध्ये आपला जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. त्यानंतर मोहम्मद कैफने ट्वीट करत पुजाराला पूर्ण पाठिंबा दिला. कैफने ट्वीट केले की, “निवडकर्ते त्याच्याबद्दल काय विचार करतात याचा त्याच्या खेळीवर अजिबात परिणाम होत नाही, पुजारा धावा करत राहतो. त्याची बांधिलकी ही टीम इंडिया आणि क्रिकेटशी असून खेळ खेळणाऱ्या सर्व तरुणांसाठी ही एक शिकवण आहे.”

अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिका खेळल्यानंतर भारताला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी व्हायचे आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघ जानेवारीच्या अखेरीस भारत दौऱ्यावर असेल. २५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताने अद्याप संघ जाहीर केलेला नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पुजाराला कामगिरी करता आली नाही. या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. तेव्हापासून पुजाराला भारतीय कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीही त्याला कसोटी संघात संधी देण्यात आली नव्हती.

आता इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी पुजाराने रणजी ट्रॉफीमध्ये शानदार फॉर्म दाखवला आहे. सौराष्ट्रच्या या फलंदाजाने नुकतेच राजकोट येथे झारखंडविरुद्धच्या सामन्यात पहिल्या दिवशी शतक पूर्ण केले. त्याने दुसऱ्या दिवशी ३१७ चेंडूत द्विशतक झळकावले. या कामाची बीसीसीआय निवड समिती दखल घेणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

हेही वाचा: पीसीबीचा मोठा निर्णय! ‘या’ खेळाडूला केले पाकिस्तान टी-२० संघाचा उपकर्णधार, काय आहे त्यामागील कारण? जाणून घ्या

तत्पूर्वी, ६ गुरुवारी केप टाऊनमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून इतिहास रचला. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात सामना संपला. केप टाऊनमधील कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करणारा भारत हा पहिला आशियाई संघ ठरला आहे. बीसीसीआयने विजयानंतरच्या काही खास क्षणांचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

टीम इंडियाच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मोहम्मद सिराजने पहिल्या डावात ६ तर जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावातही तेवढ्याच विकेट्स घेतल्या. मुकेश कुमारनेही शानदार गोलंदाजी केली. रोहित शर्माने विजयाचे श्रेय संघाच्या गोलंदाजांना दिले. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात ५५ धावांत ऑलआऊट झाला, इथेच सामन्याचा कल टीम इंडियाकडे वळला.

बीसीसीआयने विजयानंतरच्या काही खास क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. केपटाऊनमधील ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि सर्व खेळाडू खूप आनंदी होते. बाहेर पडताना खेळाडूंनी स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांना ऑटोग्राफही दिले. हॉटेलमध्ये टीम इंडियाचेही जल्लोषात स्वागत करण्यात आले, हॉटेलमधील प्रत्येकाने टाळ्यांच्या गजरात टीमचे कसे स्वागत केले, हे व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. यावेळी सर्व कर्मचारी व चाहते उपस्थित होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatever the selectors think kaif defends pujara who returned to form before ind vs eng test avw