वर्ल्डकप स्पर्धेत हैदराबाद इथे खेळताना पाकिस्तान संघाला चांगला पाठिंबा मिळाला होता. हैदराबाद इथे झालेल्या पहिल्या लढतीत पाकिस्तानने नेदरलँड्सला तर दुसऱ्या लढतीत त्यांनी श्रीलंकेला हरवलं होतं. यानंतर पाकिस्तान संघ अहमदाबादला रवाना झाला. दीड लाख चाहत्यांच्या उपस्थितीत भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. यानंतर पाकिस्तानचा संघ बंगळुरूत दाखल झाला. ५ वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानला नमवलं. यानंतर पुन्हा प्रवास करत पाकिस्तानने चेन्नई गाठलं. चेन्नईत पाकिस्तानला तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. आज चेन्नईतच त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे. पाकिस्तानला स्पर्धेतलं आव्हान जिवंत राखायचं असेल तर आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे. काही वर्षापूर्वी याच चेन्नईच्या मैदानात दर्दी चाहत्यांनी स्टँडिंग ओव्हेशन दिलं होतं. ती आठवण जागवत चांगला खेळ करण्याची संधी पाकिस्तान संघाकडे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की मैदानात सगळा पाठिंबा भारताला मिळणं साहजिक. पण चेन्नईचे चाहते देशभरात सगळ्यात अभ्यासू समजले जातात. चांगल्या खेळाचं आणि खेळाडूंचं ते कौतुक करतात. याचा प्रत्यय पाकिस्तानला आला. दोन देशांमधल्या दुरावलेल्या संबंधामुळे भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जात नाही आणि पाकिस्तानचा संघ भारतात येत नाही. फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तानचे संघ आमनेसामने येतात. पण त्याआधी दोन्ही संघ एकमेकांचा दौरा करत. १९९९ साली पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता.

दोन कसोटी सामन्यांची मालिका होती. वासिम अक्रम पाकिस्तानचा कर्णधार होता. संघात वकार युनिस, साकलेन मुश्ताक, इंझमाम उल हक, सईद अन्वर, मोहम्मद युसुफ, सलीम मलिक असे नावाजलेले खेळाडू होते.

सामन्यात काय झालं?
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र अनिल कुंबळेच्या फिरकीमुळे हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला. पाकिस्तानचा डाव 238 धावांतच आटोपला. मोईन खान (60) तर मोहम्मद युसुफ (53) यांनी अर्धशतकी खेळी केल्या. कुंबळेने 6 विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानच्या आक्रमणासमोर भारतीय फलंदाज ढेपाळले आणि त्यांनी 254 धावांपर्यंतच मजल मारली. सौरव गांगुलीने 54 तर राहुल द्रविडने 53 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून साकलेन मुश्ताकने 5 तर शाहिद आफ्रिदीने 3 विकेट्स घेतल्या. भारतीय संघाला 16 धावांची नाममात्र आघाडी मिळाली.

युवा आणि तडाखेबंद फलंदाजीसाठी प्रसिद्ध शाहिद आफ्रिदीने दुसऱ्या डावात 141 धावांची मॅरेथॉन खेळी केली. आफ्रिदीने 21 चौकार आणि 3 षटकारांसह 141 धावांची खेळी केली. आफ्रिदीचं कसोटीतलं हे पहिलंवहिलं शतक होतं.

जवागल श्रीनाथ, वेंकटेश प्रसाद, अनिल कुंबळे आणि सुनील जोशी या चांगल्या आक्रमणाला सामोरं जात आफ्रिदीने हे शतक झळकावलं होतं. इंझमाम उल हकने 51 धावा करत त्याला चांगली साथ दिली. पाकिस्तानने 286 धावा केल्या आणि भारतापुढे 271 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारतातर्फे वेंकटेश प्रसादने 6 विकेट्स पटकावल्या.

सचिनची दिमाखदार शतकी खेळी

चौथ्या डावात 271 धावा करणं हे आव्हानात्मक लक्ष्य असलं तरी भारतीय संघ जिंकण्याचा दावेदार होता. संघाचा आधारस्तंभ असलेल्या सचिन तेंडुलकरने अफलातून शतकी खेळी साकारली. सहकारी फलंदाज एकामागोमाग एक बाद होत असताना सचिनने विलक्षण तंत्रशुद्धतेसह चेन्नईच्या उकाड्यात मोठी खेळी केली. या खेळीदरम्यान सचिनची पाठदुखी बळावली होती. त्याला क्रॅम्प्सचाही त्रास जाणवत होता. मात्र या कशानेही त्याची एकाग्रता भंग झाली नाही.

सचिनला यष्टीरक्षक फलंदाज नयन मोंगियाची साथ मिळाली. मोंगियाने 52 धावांची खेळी केली. सातत्याने विकेट्स पडत असल्या तरी सचिन भारताला जिंकून देणार असंच चित्र होतं. 254 धावसंख्येवर सचिन बाद झाला. साकलेन मुश्ताकच्या गोलंदाजीवर वासिम अक्रमने त्याचा झेल टिपला.

सचिन बाद झाला त्यावेळी भारतीय संघाला जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता होती आणि 254/7 अशी स्थिती होती. पुढच्या 15 मिनिटात पाकिस्तानने अनिल कुंबळे, सुनील जोशी आणि जवागल श्रीनाथ यांना माघारी धाडत थरारक विजयाची नोंद केली.

भारताचा डाव 258 धावात गडगडला आणि पाकिस्तानने अवघ्या 12 धावांनी कसोटी जिंकली. या विजयासह पाकिस्तानने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली.

साकलेन मुश्ताकने दुसऱ्या डावात ५ आणि सामन्यात १० विकेट्स पटकावल्या. विजयाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या भारतीय संघाला नमवत पाकिस्तानने थरारक विजय मिळवला. पाकिस्तानच्या जिद्दीचं आणि खेळाचं चेन्नईकरांनी कौतुक केलं. सामना संपल्यानंतर चेन्नईकरांनी उभं राहून पाकिस्तानच्या संघाची प्रशंसा केली.

पाकिस्तानच्या खेळाडूंना, प्रशासकांना काय वाटलं?

अनेक वर्षानंतर वसिम अक्रम यांनी ‘लेसन्स लर्न्ट विथ द ग्रेट्स’ या पॉडकास्टमध्ये चेन्नईच्या प्रेक्षकांचा उल्लेख केला. अक्रम म्हणाले, दहा वर्षांनंतर आम्ही भारताच्या दौऱ्यावर गेलो होतो. प्रेक्षकांमध्ये शांतता असेल तर आपण आपलं काम चोख करत आहोत असं मी सहकाऱ्यांना सांगितलं. साकलेन मुश्ताकने अफलातून गोलंदाजी केली. त्याने ‘दुसरा’ प्रकार शोधून काढला. आम्ही चांगले खेळलो याची नोंद घेत चेन्नईच्या चाहत्यांनी आम्हाला मानवंदना दिली. तो दौरा माझा आवडता होता.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी प्रमुख आणि तत्कालीन संघाचे व्यवस्थापक शहरयार खान यांनी ‘अ ब्रिज ऑफ पीस’ या पुस्तकात चेन्नईच्या प्रेक्षकांचा उल्लेख केला आहे. भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी चाहते हजारोंच्या संख्येने जमले होते. पण आम्ही जिंकलो. त्यांना निराश वाटणं साहजिक होतं. पण त्यांनी आमच्या चांगल्या खेळाचं कौतुक करत सकारात्मकतेचं प्रतीक सादर केलं.

भारत-पाकिस्तान या दोन देशांदरम्यान त्याआधी काय घडलंय हे बाजूला ठेऊन मैदानावरच्या आमच्या चांगल्या कामगिरीला त्यांनी दाद दिली. त्यांचं वर्तन हा खेळाचा विजय होता असं शहरयार खान यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When chennai crowd gave standing ovation to pakistan cricket team psp