कधी कधी एखाद्या पदाधिकाऱ्याला पंचही दचकून असतात, असाच प्रत्यय १९८२च्या विश्वचषक स्पर्धेच्या वेळी दिसून आला. कुवेतविरुद्धच्या सामन्यात फ्रान्सकडे ३-१ अशी आघाडी होती. कुवेत संघाच्या खेळाडूंकडून बेशिस्त वर्तन झाल्यामुळे फ्रान्सला फ्री-किक बहाल करण्यात आली. फ्रान्सचा बचावरक्षक मॅक्झिम बोसिस याला ही किक मारण्याची संधी मिळाली. तो किक मारायला पुढे आला व त्याने जोरदार फटका मारून गोल केला. एवढय़ात कुवेतच्या खेळाडूंनी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजविल्यामुळे आपण खेळ थांबविला असल्याचे त्यांच्या खेळाडूंनी सांगितले.
पॅव्हेलियनमध्ये उपस्थित असलेले कुवेत फुटबॉल संघटनेचे दोन पदाधिकारीही मैदानाकडे धावले. त्यांनी पंच मिरोस्लाव स्टुपीर यांच्यावर ओरडण्यास सुरुवात केली. त्यांनी शिव्यांची लाखोली सुरू केली. कुवेतच्या पदाधिकाऱ्यांचा रागीट अवतार पाहून स्टुपीर हे खूपच घाबरले. त्यांनी बोसिसने मारलेला गोल अमान्य केला व कुवेतच्या बाजूने निर्णय दिला. या गोंधळात सुमारे पंधरा मिनिटे वाया गेली. हा सामना कुवेतने गमावला. विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर स्टुपीर यांना आंतरराष्ट्रीय पंचांचा दर्जाही गमवावा लागला.