India W vs Australia W 1st Test: भारतीय महिला संघाने वानखेडेवर संपन्न झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून इतिहास रचला आहे. महिलांच्या कसोटी सामन्यात हरमनप्रीत कौर अँड कंपनीने ऑस्ट्रेलियाचा आठ विकेट्सने दणदणीत पराभव केला. मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या जल्लोषात ऑस्ट्रेलियाची कर्णधार अ‍ॅलिसा हिलीने सर्वांची मने जिंकली. दरम्यान, अ‍ॅलिसा फोटोग्राफर म्हणून आली आणि तिने विजेत्या भारतीय महिला संघाचे फोटो काढले. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाचा गेल्या १० वर्षांतील कसोटी क्रिकेटमधील हा पहिलाच पराभव आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅलिसा हिली दुःखी होण्याऐवजी भारतीय संघाच्या आनंदात सामील होताना दिसली. ऑस्ट्रेलियन महिला कर्णधाराचा हा स्वभावाचे सोशल मीडियावर खूप कौतुक केले जात आहे. हरमनप्रीत कौर आणि तिच्या टीमचे फोटो काढताना अ‍ॅलिसा हिलीचा स्वतःचा फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती हातात कॅमेरा धरलेली दिसत आहे.

हेही वाचा: PCBच्या अडचणीत वाढ, पाकिस्तान सरकारने PSLआणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचे मीडिया हक्क विकण्यावर घातली बंदी; जाणून घ्या

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर सामन्यानंतरच्या मुलाखतीनंतर ट्रॉफीसह आनंद साजरा करत होती. त्याचवेळी अ‍ॅलिसा हिलीकडे पराभवानंतर निराश होण्याची अनेक कारणे होती. मात्र, असे असतानाही ती भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयाचे आनंदाचे क्षण कॅमेऱ्यात कैद करताना दिसली. यातून तिने खिलाडूवृत्ती दाखवून दिली.

यष्टिरक्षक फलंदाज अ‍ॅलिसा हिली गेल्या दशकात कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करणारी पहिली ऑस्ट्रेलियन कर्णधार ठरली आहे. यादरम्यान तिचा हा व्हिडीओ ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेटच्या सोशल मीडिया हँडलवरून अपलोड करण्यात आला आहे. ज्यामध्ये संघाने महिला कर्णधाराचे खूप कौतुक केले आहे. उल्लेखनीय बाब अशी आहे की, हीलीचा पती आणि ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याला नुकतेच आयपीएल लिलावात सर्वाधिक किमतीत खरेदी करण्यात आले. स्टार्कचा कोलकाता नाईट रायडर्सने एकूण २४.७५ कोटी रुपयांना संघात समावेश केला आहे.

हेही वाचा: IND W vs AUS W: भारतीय महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा पहिलाच विजय

४० कसोटींनंतर भारतीय महिला संघाचा विक्रम पुरुष संघापेक्षा सरस

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या एकमेव कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला. यादरम्यान भारतीय महिला संघाने ४६ वर्षांच्या प्रतिस्पर्ध्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिलाच विजय नोंदवला. जगातील सर्वोत्कृष्ट संघाविरुद्धच्या कसोटीतील हा त्यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

याबरोबरच टीम इंडियाने काही विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. अनेकांना हे जाणून आश्चर्य वाटेल की, भारताच्या पुरुष संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला विजय ६४ वर्षांपूर्वी १९५९ मध्ये २४ डिसेंबर रोजी कानपूरमध्ये झाला होता. येथे महिला संघाने केलेल्या विक्रमाबद्दल बोलणे महत्त्वाचे आहे. या संघाने आतापर्यंत ४० कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी सात जिंकले आहेत आणि सहा पराभूत झाले आहेत, तर २७ सामने अनिर्णित राहिले आहेत. यामुळे त्यांची विजयाची टक्केवारी १७.५० इतकी आहे, जी समान पातळीवरील भारतीय पुरुष क्रिकेट संघापेक्षा चांगली आहे. ४० कसोटींनंतर, भारतीय पुरुष संघाला केवळ तीन विजय मिळवता आले आहेत त्यात १७ पराभव आणि २० अनिर्णित राहिले. त्यांची विजयाची टक्केवारी ही केवळ ७.५० टक्के होती. सामन्यानंतर स्नेह राणाला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When the australian captain became a photographer and started taking pictures of the winning indian team see avw