KL Rahul Doubtful for Asia Cup 2023: आशिया चषक २०२३ पाकिस्तानच्या यजमानपदी खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा ३१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील सुरुवातीचे सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित सामने श्रीलंकेत होणार आहेत. पण आशिया कप २०२३च्या आधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघातील स्टार खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार नाही. हा खेळाडू गेल्या काही काळापासून दुखापतीशी झुंजत होता.
आशिया कपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का
भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू सध्या दुखापतीतून सावरत आहेत. यामध्ये के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर या दोन प्रमुख नावांचाही समावेश आहे. आयपीएलच्या १६व्या हंगामात राहुल दुखापतग्रस्त झाला होता. शस्त्रक्रियेनंतर त्यांनी संघात पुनरागमनाची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र आशिया कपपर्यंत त्याच्या पुनरागमनाची फारशी आशा नाही. असंच काहीसं श्रेयस अय्यरबाबतही आहे, जो संपूर्ण आयपीएल सीझनमधून बाहेर होता.
लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांनीही आपापल्या दुखापतींवर शस्त्रक्रिया केली आहे. यानंतर हे दोघेही आशिया कप २०२३ मधून पुनरागमन करतील अशी अपेक्षा होती. सध्या राहुल आणि अय्यरला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आणखी वेळ लागेल. राहुल सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये ट्रेनिंग घेत आहे. त्याचवेळी अय्यरही आपल्या फिटनेसवर भर देत आहे. एन.सी.ए कडून मिळालेल्या माहितीनुसार दोघेही अजून पूर्णपणे तंदुरस्त झालेले नाहीत, त्यामुळे सध्यातरी ते आशिया चषकात सहभागी होतील असे सांगता येत नाही. किमान अजून तीन महिने त्यांना पूर्णपणे बरे होण्यास वेळ लागेल.
आशिया कप २०२३ ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या या आशिया कपमध्ये टीम इंडिया आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले जाणार आहेत. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तयारी पाहता टीम इंडियासाठी हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो. आयसीसीने विश्वचषकासाठी मुख्य संघ जाहीर करण्यासाठी २९ ऑगस्टची अंतिम मुदत निश्चित केली आहे.
जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर हे अपडेट आले आहे
गेल्या वर्षभरापासून टीम इंडियातून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही झपाट्याने फिट होत आहे. रिपोर्ट्सनुसार, तो आतापर्यंत ७० टक्के फिट झाला आहे. अशा परिस्थितीत बुमराहला आयर्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाचा भाग बनवले जाऊ शकते. भारतीय संघाला ऑगस्ट महिन्यात आशिया चषकापूर्वी आयर्लंडविरुद्ध मालिका खेळायची आहे. मात्र, त्या संदर्भात अजून कोणतीही अधिकृतपणे माहिती समोर आलेली नाही.
टीम इंडियाच्या मोठ्या मॅच विनर्सपैकी एक
के.एल. राहुलने मार्च २०२३मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत ५४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १९८६ धावा केल्या आहेत ज्यात ५ शतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, राहुलने ४७ कसोटीत ३३.४४च्या सरासरीने २६४२ धावा केल्या आहेत. यादरम्यान के.एल. राहुलने १३ अर्धशतके आणि ७ शतके झळकावली आहेत. राहुलची टी२० मधील आकडेवारीही प्रभावी आहे. त्याने ७२ टी२० सामने खेळताना २२६५ धावा केल्या आहेत.