क्रीडा, सौजन्य –
‘भाग मिल्खा भाग’ सिनेमाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आता लवकरच मेरी कोमच्या जीवनावर सिनेमा येतो आहे. क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तिरेखांवर सिनेमे आले, ते चांगले चालले, याचा अर्थ क्रीडा क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत, असं मात्र नाही. चांगल्या खेळांचा चांगला सिनेमा झाला असला तरी आपल्या करंटेपणामुळे प्रत्यक्षात क्रीडा क्षेत्राचा मात्र खेळखंडोबाच होतो आहे.
सध्या ‘बॉक्स ऑफिस’वर चांगलाच धावलेला सिनेमा म्हणजे ‘भाग मिल्खा भाग’. एका आदर्श धावपटूची पडद्यावर अप्रतिमपणे रेखाटलेली कहाणी. महान धावपटू मिल्खा सिंग यांनी परिस्थितीच्या खाचखळग्यातून वाट काढत केलेली यशस्वी वाटचाल दाखवणाऱ्या या चित्रपटाने जनमानसावर गारूड केले आहे. या चित्रपटामुळे मिल्खा सिंग पुन्हा एकदा नव्याने साऱ्यांपुढे आले आहेत. क्रीडा क्षेत्रात आजच्यासारख्या कोणत्याही सोयीसुविधा, कोणतंही ग्लॅमर नसताना मिल्खा सिंगसारख्यांनी आपल्या जिद्दीच्या बळावर देशाचं नाव उंचावलं. त्यांच्या काळात आजच्यासारख्या क्षणोक्षणीची अपडेटस् देणाऱ्या वृत्तवाहिन्या नव्हत्या, की कोणतीही गोष्ट घडली की लगेच सांग जगाला या पद्धतीची फेसबुक, ट्विटरसारखी माध्यमं नव्हती. त्यामुळे आजच्या पिढीला कदाचित त्यांची कामगिरी माहीत नसेल आणि ज्यांना माहिती असेल त्यांच्या कदाचित विस्मृतीतही गेली असेल. त्यामुळेच ‘भाग मिल्खा भाग’सारख्या सिनेमातून त्यांची कामगिरी, त्यांची मेहनत, जिद्द हे सगळं आजच्या तरुणाईला पुन्हा एकदा सांगणं महत्त्वाचं ठरलं. आजच्या पिढीला हा सिनेमा आवडलाही. या सिनेमामुळे धावपटूंचे आयुष्य काय असते हे लोकांना समजलं, पण या चित्रपटाच्या माध्यमातून क्रीडापटूंबरोबरच क्रीडा क्षेत्राची सध्याची परिस्थिती बदलणार आहे का, हा मोठा प्रश्न आहे.
चित्रपट हे मनोरंजनाचे एक माध्यम आहे, असं मानणारा एक गट आपल्याकडे आहे, तर चित्रपटातून संदेश दिला जावा, असं मानणारा एक गट आहे. त्यामुळेच काही वेळा सामाजिक संदेश देण्यासाठी चित्रपटाचा सुयोग्य वापर केला जातो, तर काही वेळा असामान्य व्यक्तिमत्त्वाचे चित्र रेखाटत, त्याने घेतलेली मेहनत, त्याची गुणवत्ता, त्याच्या वाटय़ाला आलेले कटू प्रसंग, यशापयशाच्या हिंदोळ्यावर डोलणारी त्याची कारकीर्द, दाखवली जाते. खेळांवर आतापर्यंत बरेच सिनेमे आले. देव आनंद साहेबांचा ‘अव्वल नंबर’ असेल किंवा कुमार गौरवचा ‘ऑलराऊंडर’, त्यानंतर ‘फुटबॉल’, ‘शूटबॉल’, ‘गोल’ असे काही सिनेमे आले. मराठीत म्हणाल तर ‘चॅम्पियन’ आणि ‘अिजक्य’ हे दोन सिनेमेही खेळावर आले होते, पण यामध्ये सुपरहिट झालेले सिनेमे म्हणजे ‘लगान’, ‘चक दे इंडिया’ आणि सध्याचा ‘भाग मिल्खा भाग’.
‘वाईट प्रवृत्तींवर, गोष्टींवर चांगल्या प्रवृत्तींनी, गोष्टींनी मात करता येते’ एवढी साधी-सरळ टॅग लाइन असलेला ‘लगान’ हा चित्रपट, पण भारतात धर्म मानल्या जाणाऱ्या क्रिकेटचा आधार या वेळी दिग्दर्शक अविनाश गोवारीकरने घेतला. क्रिकेटमधले बारकावे त्याने त्यामध्ये दाखवले. खेळातील संघभावना, शह-काटशह यांच्याबरोबर या खेळातील गंमतही त्याने साध्या पण संयत पद्धतीने मांडली. अखेरच्या चेंडूवरचा सस्पेन्स त्याने फुलवला आणि लांबी जास्त असलेला सिनेमा असूनही लोकांनी तो पाहायला लांबच लांब रांगा लावल्या. भारतामध्ये क्रिकेट जवळपास राष्ट्रीय खेळ असल्यासारखाच आहे. त्यामुळे लोकांमध्ये असलेली क्रिकेटबद्दलची क्रेझ सिनेमासाठी पोषक ठरली, पण या सिनेमाचा कोणताही परिणाम क्रिकेटवर झाला नाही, उलटपक्षी क्रिकेटचीच या सिनेमाला चांगली मदत झाली.
‘चक दे इंडिया’ने हॉकीला जबरदस्त ग्लॅमर मिळवून दिले. त्या काळात एखादा गोल झाला तरी प्रेक्षक ‘चक दे इंडिया’ या नावाचा जयघोष करायचे. खरं तर हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ, पण लौकिक मात्र तसा नाही. प्रशिक्षक नीररंजन नेगी यांच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा. एक पराभव तुम्हाला आयुष्यातून कसा उठवू शकतो आणि एक विजय तुम्हाला केवढय़ा उंचीवर नेऊ शकतो, याचं अप्रतिम चित्रण सिनेमामध्ये होतं. जिद्द, मेहनत आणि संघभावनेच्या जोरावर तुम्ही यश संपादन करू शकता, हे दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमामध्ये केला, पण या सिनेमाने हॉकीला काही मदत झाली का, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नाही असेच येते. जेव्हा सिनेमा होता तेव्हा काही महिने ‘चक दे इंडिया’च्या नावाने आरोळ्या ठोकल्या जायच्या, पण हॉकीमध्ये कोणत्या प्रकारची सुधारणा झाली नाही. सोयीसुविधा तेवढय़ा अपुऱ्या, मर्यादित राहिल्या, त्यांच्यामध्ये वाढ झाली नाही. खेळात सुधारणा तर सोडाच, सध्या आपण अधोगतीवर आहोत. पुरुष आणि महिला संघांना गेल्या काही वर्षांमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. लोकांनी ‘चक दे इंडिया’च्या वेळी हॉकीबरोबर हॉकीपटूंना सहानभूती दाखवली खरी, पण सध्याच्या घडीला हॉकी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या फेव्हरिट खेळांच्या यादीमध्ये नाही. काही दिवसांपूर्वीच ज्युनिअर विश्वचषकात भारतीय महिलांनी कांस्यपदक पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली, त्यानंतर त्यांच्यावर बक्षिसांची खैरात करण्यात आली खरी, पण त्यांच्या तयारीच्या वेळी जर काही मदतीचे हात त्यांना मिळाले असते तर नक्कीच निकालामध्ये सुधारणा होऊ शकली असती.
‘भाग मिल्खा भाग’ सिनेमाचं दिग्दर्शन किंवा फरहान अख्तरचा अभिनय, याला तोडच नाही. फाळणीच्या काळात जवळपास सगळं कुटुंब गमावून बसलेल्या मिल्खाने काही तरी करून दाखवण्यासाठी सेनादलामध्ये केलेला प्रवेश, त्यानंतर धावपटू म्हणून त्याची झालेली निवड, त्याने घेतलेली मेहनत, त्याची जिद्द, आंतरराष्ट्रीय दर्जावर केलेली देदीप्यमान कामगिरी, पाकिस्तानमधली शर्यत जिंकून ‘फ्लाइंग सीख’ हा मिळालेला नामाचा किताब, हे सारे काही विलक्षण अनुभूती देऊन जाते, पण या सिनेमामुळे अॅथलेटिक्स या खेळात सुधारणा झाली का? तर नाही.
संदेश पोहोचवण्याचं सिनेमा हे प्रभावी माध्यम असलं तरी लोक आपल्याला जे हवं ते सोयीस्करपणे घेतात आणि बाकीचं कितीही चांगलं असलं आणि त्यांना ते पटत नसलं तर ते घेत नाहीत, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. सिनेमा आला, तो हिट झाला, की काही दिवस त्याचा गवगवा नक्कीच असतो. यामधून त्या खेळाला किंवा खेळाडूला काही दिवस ग्लॅमर मिळतं, पण त्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या. खेळ आणि तो खेळाडू, हे नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर पुन्हा एकदा विस्मरणात जातात.
मिल्खा सिंग असो किंवा मेजर ध्यानचंद किंवा भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव, त्यांच्यानंतर असे खेळाडू भारतात झाले नाहीत. ते का झाले नाहीत, हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. त्या काळानंतर खेळाचा प्रसार सर्वत्र झाला आणि लहान देश पुढे आले. त्यामुळे स्पर्धा वाढली, पण भारताची त्यामध्ये पीछेहाट होत गेली. एक काळ भारताने हॉकीचा सुवर्णकाळ पाहिला खरा, पण सध्याची आपली अवस्था कशी आहे हे न सांगणंच बरं. आपण खेळाला गांभीर्याने घेतलं नाही, हीच आपली सर्वात मोठी चूक आहे. अगदी शाळेपासूनच अभ्यासच महत्त्वाचा असं सांगणाऱ्या पालकांकडून तुम्ही कोणत्या अपेक्षा करणार? त्यांचेच सर्वस्वी चुकतं असंही नाही, तर खेळात (क्रिकेट वगळता) करीअर करावं, असे वातावरण निर्माण करण्यात सरकारला अपयश आलेलं आहे. इथे महाराष्ट्रात मानाचे छत्रपती पुरस्कार लटकलेले, खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय दर्जावर कामगिरी करूनही नोकऱ्या नाहीत, कसलीच हमी नाही, मग कशाला आपल्या पाल्याला खेळाडू बनवण्याचं स्वप्न पालक बघतील? सरकारने ‘भाग मिल्खा भाग’ टॅक्स-फ्री केला, पण इथे गावागावांमध्ये असलेल्या युवा धावपटूंचे काय? त्यांच्याकडे सरकारचं लक्ष नाही. सरकारच्या पावलावर पाऊल टाकत काही संस्थाही तशाच. गेली दहा वर्षे मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन होते, बक्कळ पैसा कमावतात, त्यामध्ये कर चुकवेगिरीही करतात, पण धावपटूंना बक्षीस वगळता काय मिळतं, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. प्रत्येक वर्षी त्यांनी किमान एक धावपटू दत्तक घेतला असता, तर आतापर्यंत भारताला त्यांनी दहा अव्वल धावपटू दिले असते, पण तसं होताना दिसलं नाही.
क्रीडा प्राधिकरणामध्ये खेळाडूंची जी व्यवस्था केलेली असते ती पाहून कीव येते. आपण त्यांना कोणत्याही सुविधा देणार नाही, साधं त्यांच्या राहायच्या खोलीला कडय़ा नसतात, प्रसाधनगृह अस्वच्छ, आहार पोषक नसतोच, मिळेल ते खाऊन हे भावी खेळाडू सराव करत असतात आणि त्यांच्याकडून अपेक्षा मात्र असते ती आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव उज्ज्वल करण्याची, पदकं जिंकण्याची. अशी अपेक्षा आपण कशाच्या जोरावर बाळगतो?
मिल्खा सिंग, ध्यानचंद, खाशाबा जाधव, हे महानच होते. त्यांच्यासारखा दुसरा कुणी होणे नाही, पण याचा अर्थ असा नाही की, भारतामध्ये गुणवत्ता नाही. आपल्याकडे नाही ती त्या गुणवत्तेकडे पाहण्याची दृष्टी. खाशाबा, ध्यानचंद यांचा काळ वेगळा होता. तेव्हा तंत्रज्ञान जास्त विकसित झालेले नव्हते. आताच्या घडीला तंत्रज्ञान विकसित झालेले असले तरी आपण त्यामध्ये कुठे आहोत? आहारापासून ते व्यायामापर्यंत आपल्यामध्ये काही बदल झाला का, तर फारसा नाहीच. जिथे मूलभूत गोष्टीच नीट नाहीत, पायाच कमकुवत आहे, तिथे यशाचे इमले कसे काय रचले जाणार, हा मोठा प्रश्न आहे.
एखाद्या खेळावर, खेळाडूवर, प्रशिक्षकावर सिनेमा येणं ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. आता मिल्खा सिंग यांच्यावर आला, काही महिन्यांमध्ये महिला बॉक्सिंगपटू मेरी कोमवरही सिनेमा येतोय; पण या सिनेमांमुळे खेळामध्ये बदल होणार का, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार का, खेळाडूंचे भले होणार का, त्यांना मूलभूत सोयीसुविधा मिळणार का किंवा हे सिनेमे काढणारे या खेळाडूला किंवा खेळाला कोणती मदत करणार का, हे सारे प्रश्न खेळावर जवळपास डझनभर सिनेमे येऊनही अनुत्तरितच राहतात. हे प्रश्न जेव्हा सुटायला लागतील तेव्हा खऱ्या अर्थाने या सिनेमांना अर्थ प्राप्त होईल, अन्यथा येरे माझ्या मागल्याच.
कधी होणार खराखुरा ‘चक दे?’
‘भाग मिल्खा भाग’ सिनेमाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आता लवकरच मेरी कोमच्या जीवनावर सिनेमा येतो आहे. क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तिरेखांवर सिनेमे आले, ते चांगले चालले, याचा अर्थ क्रीडा क्षेत्राला...
First published on: 20-08-2013 at 06:23 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When will india shine in sports