क्रीडा, सौजन्य –
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न दिले जावे, या केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या शिफारशीमुळे हॉकीपटूच नव्हे तर तमाम भारतीयही सुखावले. तब्बल २८ वर्षे देशाला हॉकीच्या शिखरावर नेऊन ठेवणाऱ्या ध्यानचंद यांचा खरा सन्मान करायचा असेल तर हॉकीचे सुवर्णयुग पुन्हा यावे यासाठी जाणीवपूर्वक आणि प्रामाणिक प्रयत्न गरजेचे आहेत.
हॉकीचे जादूगार म्हणून केवळ भारतातच नव्हे तर जगातही लोकप्रियता मिळविलेले मेजर ध्यानचंद यांच्या नावाची शिफारस ‘भारतरत्न’ या सर्वोच्च सन्मानासाठी करण्यात आली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ही शिफारस करीत अतिशय स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. मात्र हॉकीत भारतास पुन्हा सुवर्णयुग मिळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने कै. ध्यानचंद यांना श्रद्धांजली लाभेल. ही जबाबदारी केवळ शासनाची नसून हॉकीशी संबंधित सर्व घटकांची आहे.
‘भारतरत्न’ हा आपल्या देशातील सर्वात श्रेष्ठ व्यक्तीस दिला जातो. या किताबासाठी मुळातच क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीस देण्याबाबत शासकीय स्तरावरच यापूर्वी उदासीनता दिसून येत होती. आजपर्यंत कला, साहित्य, राजकारण, सामाजिक विकास आदी क्षेत्रांमधील व्यक्तींनाच हा सन्मान देण्यात आला आहे. क्रिकेट क्षेत्रात केवळ भारतात नव्हे तर साऱ्या जगात आपली कीर्ती नेणाऱ्या सचिन तेंडुलकर याला डोळ्यांसमोर ठेवीत या सन्मानाच्या नियमावलीत काही बदल करण्यात आले. क्रिकेटप्रेमींनी सचिनला हा सन्मान देण्यासाठी सातत्याने मागणीही केली आहे. बुद्धिबळात पाच वेळा विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या विश्वनाथन आनंद याला हा सन्मान दिला जावा, अशीही अनेकांनी मागणी केली आहे. खरं तर सचिन किंवा आनंद यांनी स्वत: या सन्मानाबाबत कधीच आग्रह धरलेला नाही. मुळातच या दोन्ही व्यक्तींची एवढी लोकप्रियता आहे की ‘भारतरत्न’ ते केव्हाच झाले आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ध्यानचंद यांच्या नावाची या किताबाकरिता शिफारस करीत अतिशय सुखद धक्का दिला आहे.
हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ असला तरी कित्येकांना क्रिकेट सोडून हॉकीला राष्ट्रीय खेळ का मानतात असे वाटत असते. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कै. मन्सूर अली खान पतौडी यांनी आपल्या हयातीत अनेक वेळा क्रिकेटला राष्ट्रीय खेळाचे स्थान द्यावे, अशी जाहीर मागणीही केली होती. अनेकांना हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे, हे सांगूनही पटणार नाही असेच विदारक चित्र हॉकीबाबत आपल्या देशात निर्माण झाले आहे.
जादूगार ध्यानचंद!
ध्यानचंद यांच्या युगात भारताने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णयुग निर्माण केले होते. भारताने १९२८ ते १९५६ या कालावधीत सातत्याने हॉकीत ऑलिम्पिक विजेतेपद टिकविले होते. ध्यानचंद यांच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाची अनेक संघांना भीती वाटत असे. आता आपल्यास कोणीही घाबरत नाही अशीच स्थिती आहे. ध्यानचंद यांच्याकडे चेंडू गेला की प्रतिस्पर्धी संघावर गोल लागणारच अशीच त्यांची ख्याती होती. ध्यानचंद यांचा समावेश भारतीय संघात असताना भारताने ऑलिम्पिक स्पर्धामध्ये ३३८ गोल नोंदविले होते. त्यापैकी १३३ गोल ध्यानचंद यांनी केले होते. १९३५ मध्ये भारताने न्यूझीलंडचा दौरा केला होता. त्या वेळी ध्यानचंद यांनी ४८ सामन्यांमध्ये २०१ गोल नोंदविले होते. दोन महायुद्धांमुळे ध्यानचंद यांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत खंड पडला. भारतास स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय संघाने पूर्व आफ्रिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात ध्यानचंद यांनी २२ सामन्यांमध्ये ६१ गोल केले होते आणि त्या वेळी त्यांचे वय ४२ वर्षे होते. चाळिशी ओलांडल्यानंतरही त्यांची गोल करण्याची शैली अतुलनीयच होती. ध्यानचंद यांचे नाव जर्मनीतील एका शहरातील रस्त्यास देण्यात आले आहे. ध्यानचंद यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ किताब मिळाला तर खरोखरीच हॉकी क्षेत्राचा गौरव होईल.
हॉकीत १९६० नंतर भारतास फक्त १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविता आले होते आणि तेही ऑस्ट्रेलियासह अनेक दोस्त राष्ट्रांनी या स्पर्धेवर बहिष्कार घातल्यामुळे भारत म्हणजे ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ अशी स्थिती होती. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये हॉकीत भारताची पाटी कोरीच राहिली आहे. बीजिंग ऑलिम्पिककरिता भारतीय संघावर पात्रता फेरीतच पराभूत होण्याची नामुष्की ओढविली होती. हॉकीच्या इतिहासात प्रथमच भारतावर ही परिस्थिती ओढविली. संघटनात्मक स्तरावर विकोपास गेलेली भांडणे, मूठभर लोकांच्या हातात एकवटलेली हॉकीची सत्ता, हॉकीशी सुतराम संबंध नसलेल्या लोकांकडे हॉकीचा कारभार, तळागाळात हा खेळ नेण्याबाबत दिसून येणारी उदासीनता, प्रायोजकांचा नकारात्मक दृष्टिकोन, एक खेळ परंतु अनेक संघटना आदी विविध कारणांस्तव भारताने हॉकीत हसू ओढवून घेतले.
संघटनात्मक मतभेद!
हॉकीत गेल्या दहा वर्षांमध्ये संघटनात्मक स्तरावर सतत मतभेद दिसून येत आहे. एक खेळ एक संघटना हे तत्त्व फक्त कागदावरती राहिलेले आहे. भारतीय हॉकी महासंघ व हॉकी इंडिया यांच्यातील मतभेद अद्यापही संपलेले नाहीत. हे मतभेद मध्यंतरी एवढे विकोपास गेले होते की आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने हॉकीत भारताची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला होता. चॅम्पियन्स स्पर्धेसह काही स्पर्धाकरिता भारताचे संयोजनपदही काढून घेतले होते. ऑलिम्पिकपूर्व पात्रता स्पर्धेचेही संयोजनपद गेल्यानंतर ऑलिम्पिक प्रवेश दुरावणार, अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर भारतीय हॉकी संघटक खडबडून जागे झाले. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडे अनेक वेळा मिनतवाऱ्या केल्यानंतर ऑलिम्पिकपूर्व पात्रता फेरीचे आयोजन करण्याची संधी भारताला मिळाली आणि त्याद्वारे चांगली कामगिरी करीत भारताने लंडन ऑलिम्पिकमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये प्रवेश न करण्याची नामुष्की भारताने टाळली. हात पोळल्यानंतरही अद्याप हॉकी इंडिया व भारतीय हॉकी महासंघ यांच्यातील मतभेद संपलेले नाहीत.
एक खेळ व अनेक संघटना ही स्थिती केवळ राष्ट्रीय स्तरावर नव्हे तर राज्य व जिल्हा स्तरावरही हीच अवस्था दिसून येत आहे. महाराष्ट्रातच किमान पाच ते सहा संघटना कार्यरत आहेत. जे कोणी चांगले करीत असेल, त्याचे पाय कसे ओढता येईल यासाठी सतत हॉकी संघटक प्रयत्न करीत असतात. विशेषत: हॉकीशी जराही संबंध नसलेल्या व्यक्तींकडूनच असे प्रयत्न होत असतात ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंकडे संघटनात्मक जबाबदारी द्यावी, असे जाहीरपणे सांगितले जात असते, मात्र प्रत्यक्षात अशा घोषणा कागदावरतीच राहतात. प्रत्यक्षात अशी व्यक्ती जर चांगले काम करीत असेल तर या व्यक्तीचे कसे खच्चीकरण केले जाईल असेच पाहिले जात आहे. क्रिकेटमधील उत्तेजक सेवन प्रकरण, स्पॉट फिक्सिंग, तसेच संघटना स्तरावर अंतर्गत मतभेद यामुळे अनेक उद्योग समूहांनी क्रिकेटला प्रायोजकत्व देण्याऐवजी हॉकीच्या विकासाकरिता मदत करण्यास सुरुवात केली आहे. हॉकीसाठी ही स्वागतार्ह गोष्ट असली तरी प्रत्यक्षात हॉकीतील गलिच्छ राजकारणामुळे आपण कोणत्या संघटनेस मदत करावयाची, असा प्रश्न त्यांना पडत असतो. एक खेळ एक संघटना हे तत्त्व राष्ट्रीय स्तरापासून जिल्हा पातळीपर्यंत सर्व स्तरांवर तातडीने राबविले पाहिजे. त्याकरिता शासनानेच कायदा करण्याची आवश्यकता आहे.
धरसोड वृत्ती!
परदेशी प्रशिक्षकाबाबत आपल्याकडे सतत प्रयोग केले जात आहेत. एकीकडे परदेशी प्रशिक्षक नकोत असे म्हणत असतानाच हाय परफॉर्मन्स डायरेक्टर म्हणून आपणच परदेशी प्रशिक्षकाकडे जबाबदारी सोपवायची आणि दुसरीकडे भारतीय संघासाठी नियुक्त केलेल्या परदेशी प्रशिक्षकाची हकालपट्टी करायची, असे दुटप्पी धोरण आपल्याकडेच अनुभवास मिळते. परदेशी व्यक्तीकडे प्रशिक्षकाची जबाबदारी सोपविल्यानंतर त्याला संपूर्ण सहकार्य देण्याऐवजी त्याचे पाय कसे खेचले जातील यासाठी प्रयत्न करायचे असेच राष्ट्रीय स्तरावर दिसून येते. परदेशी प्रशिक्षक अनुभवी असले तरी जर त्यांना इतरांकडून अपेक्षेइतके साहाय्य मिळत नसले तर ते तरी काय करणार. होजे ब्रासा व मायकेल नॉब्स यांना असाच अनुभव आला. या प्रशिक्षकांनी भारतीय हॉकीस पुन्हा नावलौकिक मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. घोडय़ाला पाणी देण्यासाठी तुम्ही भलेही त्याला ओढय़ापाशी घेऊन गेला पण त्याने पाणीच घेतले नाही तर तुम्ही काय करणार, असाच अनुभव ब्रासा व नॉब्स यांना आला. प्रत्यक्ष सामन्यात प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध कशी व्यूहरचना करायची, कसे पास द्यायचे, कोणत्या पोझिशनला केव्हा कोणी खेळावयाचे, असे नियोजन जरी या प्रशिक्षकांनी केले पण जर खेळाडूंनी त्यानुसार न खेळता स्वत:च्या मनाप्रमाणे खेळ केला तर या प्रशिक्षकांचे नियोजन कागदावरच राहणार.भारतीय संघात आपले स्थान अढळ आहे, असे अनेक खेळाडू मानत असतात. उदाहरणार्थ संदीपसिंग याला असे वाटत होते की पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करण्यात फक्त आपणच तरबेज आहोत. मात्र बचावफळीत खेळताना त्याच्या खेळातील उणिवा ऑलिम्पिक स्पर्धेत स्पष्टपणे दिसून आल्यानंतर नॉब्स यांनी त्याला संघातून काही काळ बाहेर ठेवण्याचे धाडस दाखविले होते. आपले संघातील स्थान अढळ आहे, असे कोणी समजू नये हे नॉब्स यांचे तत्त्व होते आणि त्यानुसार त्यांनी ‘फॉर्म’मध्ये नसलेल्या वरिष्ठ खेळाडूंना संघातून डच्चू देण्यात मागेपुढे केले नाही. त्यामुळे मनदीपसिंग, मनप्रीतसिंग आदी युवा खेळाडूंना भारताच्या वरिष्ठ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आणि या संधीचे या खेळाडूंनी सोने केले. अर्थात नॉब्स यांच्या या कृतीने हॉकीचे काही संघटक दुखावले गेले व त्यांनी नॉब्स यांना प्रशिक्षकपदावरुन दूर करण्यासाठी षड्यंत्र रचले. नॉब्स यांना या पदावरून दूर करण्यात ते यशस्वीही झाले. परदेशी प्रशिक्षकाबाबत दिसून येणारी धरसोड वृत्ती किती दिवस ठेवणार, हाच खरा प्रश्न आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविण्याची क्षमता असलेले नैपुण्य भारतात नक्कीच आहे, मात्र या नैपुण्याचा विकास अपेक्षेइतका केला जात नाही. अनेक वेळा हे नैपुण्य कुजविले जाते. जर जिल्हा स्तरावरील स्पर्धामध्ये वीस ते पंचवीस संघ भाग घेत असतील तर किमान चारशे खेळाडू एका वेळी खेळत असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. या चारशे खेळाडूंमधून एकही ऑलिम्पिकपटू का घडू शकत नाही याचा विचार हॉकी संघटकांकडून केला जात नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघास सुवर्णपदक मिळवून देणारा भारताचा कर्णधार धनराज पिल्ले या पुण्याच्या खेळाडूचे स्थानिक संघटकांनी केवढे भव्य स्वागत करायला पाहिजे होते पण तसा चांगला प्रसंग कधीच घडला नाही. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोपाखाली काही महिने तिहार तुरुंगाची हवा खाणाऱ्या माजी केंद्रीय मंत्र्यांचे ते तुरुंगातून परत आल्यानंतर मिरवणुकीद्वारे स्वागत केले जाते. ही आपली नीतिमूल्ये आहेत. त्यांनाच आपण पुन्हा क्रीडा संघटनेच्या खुर्चीत बसविण्याचा प्रयत्न करीत असतो. ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. हॉकीतही असेच विदारक चित्र पाहावयास मिळते. गगन अजितसिंग याने हातात हॉकी स्टीक पुन्हा धरू नये, असे मत जाहीरपणे व्यक्त करणाऱ्या के.पी.एस.गिल यांनाच आपण हॉकीची सूत्रे देण्यात धन्यता मानतो. हॉकी क्षेत्राला लागलेली वाळवी मुळापासूनच उपटून टाकण्याऐवजी ती कशी वाढेल, अशीच वृत्ती संघटकांमध्ये दिसून येत आहे. हॉकीच्या प्रचार व प्रसाराकरिता दूरगामी योजना आखून प्रयत्न करण्याऐवजी एकमेकांमध्ये भांडणे लावण्यातच त्यांना समाधान वाटते. भारतीय हॉकी महासंघाने आयोजित केलेली जागतिक हॉकी लीग व त्यानंतर हॉकी इंडियाने आयोजित केलेली भारतीय हॉकी लीग या दोन्ही स्पर्धामध्ये परदेशी खेळाडूंनी अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेतला. प्रायोजकांनीही या स्पर्धा उचलून धरल्या. मात्र या स्पर्धाद्वारे हॉकीचा अधिकाधिक प्रचार करण्यात अपेक्षेइतके यश मिळाले नाही. या स्पर्धाचे मार्केटिंग करण्यात या संघटकांना अपयशच आले. एक मात्र नक्की की परदेशी खेळाडू, संघटकांनी या स्पर्धाबद्दल कौतुकास्पद उद्गार व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघानेही भारतीय हॉकी संघटकांना शाबासकी दिली. हे सगळे बदलायचे असेल तर ‘एक खेळ एक संघटना’ कशी राहील याकरिता कायदा करण्याचा प्रयत्न शासनाने केला पाहिजे.
मेजर ध्यानचंद यांच्या कार्याचा गौरव व्हावा, अशी हॉकी संघटकांची इच्छा असेल तर २०१६ च्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी त्यांनी सच्च्या दिलाने प्रयत्न केले पाहिजेत.