हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने कॅरेबियन बेटांवर सुरु असलेल्या महिला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय महिलांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियावर 48 धावांनी मात केली. आतापर्यंत संघाने केलेल्या कामगिरीवर कर्णधार हरमनप्रीत कौर समाधानी आहे.
“जेव्हा तुम्ही चांगल्या संघासोबत खेळत असता तेव्हा आपसुकच तुमच्याकडून चांगली कामगिरी होते. मी माझ्या संघाच्या कामगिरीवर समाधानी आहे. आम्ही मेहनत केली, आणि क्षेत्ररक्षणातल्या चुकाही यावेळी टाळल्या. माझ्यात आणि स्मृतीमध्ये झालेली भागीदारी यापुढेही अशीच सुरु राहील अशी मला आशा आहे. मला माझ्या संघाचा अभिमान आहे.” ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यानंतर हरमनप्रीत पीटीआयशी बोलत होती.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय महिलांनी क्षेत्ररक्षणाच गचाळ कामगिरी केली होती. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय महिलांचं एक वेगळचं रुप मैदानात पहायला मिळालं. स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रीग्ज यांनीही आतापर्यंत झालेल्या सामन्यात आश्वासक कामगिरी केली आहे. त्यामुळे आगामी सामन्यात भारतीय महिला संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्व क्रीडाप्रेमींचं लक्ष असणार आहे.
अवश्य वाचा – WWT20 IND vs AUS : स्मृतीचा ऑस्ट्रेलियाला तडाखा; गुणतक्त्यात भारत अव्वल