Gautam Gambhir on Babar Azam: विश्वचषकात पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या या कर्णधारपदाच्या नेतृत्वाबदल भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने मोठे विधान केले आहे. तो म्हणाला, “बाबरचा हा निर्णय त्याला खूप पुढे घेऊन जाणार असून आता जगाला नवा बाबर आझम दिसेल.” पाकिस्तान संघाला यामुळे खूप फायदा होणार, असा विश्वासही माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केला आहे. कर्णधारपद सोडले म्हणजे बाबर आता मुक्तपणे फलंदाजी करेल, असे गंभीर म्हणाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौतम गंभीरने बाबर आझमचे केले कौतुक

स्पोर्ट्सकीडाशी बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “आता तुम्हाला बाबर आझमची सर्वोत्तम कामगिरी दिसेल. पाकिस्तानचे कर्णधारपद सोडल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे वेगळा बाबर आझम दिसेल. विश्वचषकापूर्वी मी बाबरची टूर्नामेंटचा फलंदाज म्हणून निवड केली होती. मात्र कर्णधारपदाच्या दबावामुळे त्याला फलंदाजीत फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्याचा फॉर्म खराब झाला कारण, जेव्हा तुम्ही कर्णधार असाल आणि तुमचा संघ चांगली कामगिरी करत नसेल तेव्हा तो किती दडपणाखाली असेल याची तुम्ही कल्पना करू शकता.”

हेही वाचा: IND vs SA: वनडे मालिकेच्या आयोजनाबद्दल मांजरेकरांनी दक्षिण आफ्रिका बोर्डावर केली टीका; म्हणाले, “टी-२० हंगामात…”

बाबर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे

बाबर सध्या पाकिस्तान संघाबरोबर ऑस्ट्रेलियात आहे, जिथे तो १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर त्याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका आहे. भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत बाबरने ९ सामन्यात ४०च्या सरासरीने आणि ८२.९०च्या स्ट्राईक रेटने ३२० धावा केल्या, ज्यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे.

सध्या लिजेंड्स लीग क्रिकेट मध्ये खेळत असलेल्या गौतम गंभीरने सांगितले की, “जेव्हा पाकिस्तान संघ २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकला नाही, तेव्हा बाबर आझमवर दबाव आणखी वाढला. या दबावाचा परिणाम त्याच्या फलंदाजीवरही दिसून आला. या स्पर्धेत पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीचा दावेदार मानला जात होता मात्र तो येथे पोहोचू शकला नाही.”

हेही वाचा: WI: टी-२० विश्वचषकापूर्वी वेस्ट इंडिज संघासाठी वाईट बातमी! निकोल्स पूरनसह ‘या’ तीन दिग्गज खेळाडूंनी नाकारला केंद्रीय करार

गंभीर पुढे म्हणाला, “आता जगाला असा बाबर आझम दिसेल, जो याआधी कधीच कोणीही पाहिला नसेल. आता तो नव्या स्वरुपात फलंदाजी करताना दिसेल. आजपासून ते निवृत्त होण्याच्या दिवसापर्यंत तुम्हा सर्वांना त्याची खरी क्षमता दिसेल. बाबरकडे सर्व प्रकारचे शॉट्स आहेत ज्यामुळे तो पाकिस्तानचा सर्वोत्तम फलंदाज बनू शकतो. अजून त्याच्याकडे जवळपास १० वर्षे आहेत, जिथे कर्णधारपदाचे कोणतेही दडपण नसेल. तो किती विक्रम मोडतो हे पाहणे माझ्यासाठी उत्सुकतेचे असणार आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: While praising babar azam gambhir told why he will now become the greatest batsman in pakistan cricket history avw