पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा ७४ धावांनी पराभव केला. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने पाकिस्तानवर १-० अशी आघाडी घेतली आहे. पाकिस्तानविरुद्धचा हा विजय इंग्लंडसाठी ऐतिहासिक ठरला आहे. खरं तर, या कसोटी सामन्यात एकूण १७६८ धावा झाल्या आणि ३७ गडी बाद झाले, याशिवाय ७ फलंदाजांनीही शतके झळकावली. ८०० धावा करूनही पाकिस्तानचा संघ पराभूत झाला. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत इंग्लंडने आक्रमक शैली दाखवली आणि दुसऱ्या डावात इंग्लंडच्या कर्णधाराने मोठा निर्णय घेत चौथ्या दिवशी डाव घोषित केला. डाव घोषित झाला तेव्हा इंग्लंडने पाकिस्तानला विजयासाठी १०० षटकांत ३४३ धावांचे लक्ष्य दिले होते.
इंग्लंडच्या या निर्णयाने चाहतेच नव्हे तर जागतिक क्रिकेटलाही आश्चर्याचा धक्का बसला. एकीकडे हा कसोटी सामना अनिर्णितकडे वाटचाल करत होती, पण बेन स्टोक्सच्या आक्रमक कर्णधारपदाच्या नेतृत्वाखाली संघाने पलटवार केला आणि अखेरीस हा कसोटी सामना ७४ धावांनी जिंकण्यात इंग्लंडला यश आले. इंग्लंडच्या दणदणीत विजयानंतर माजी कर्णधार मायकेल वॉनने एक खास ट्विट केले जे व्हायरल झाले.
वास्तविक, वॉनने आपल्या ट्विटमध्ये या कसोटी विजयाचे ऐतिहासिक वर्णन केले आणि म्हटले की, “कसोटी क्रिकेटमध्ये असा विजय आश्चर्यकारक आहे. असा निर्णय कोणत्याही कर्णधाराने घेतल्याचे मला आठवत नाही. विश्वास ठेवणे कठीण आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले की, “मला कसोटी क्रिकेटमधील इतर कोणत्याही कर्णधाराला माहित नाही, ज्याने आपल्या संघाला अशाप्रकारे फलंदाजीसाठी प्रोत्साहित केले. तसेच, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ज्या पद्धतीने डाव घोषित केला, ते अविश्वसनीय आहे”.
मायकल वॉनच्या या ट्विटनंतर चाहते सतत ट्विट करून कोहलीच्या कर्णधारपदाची आठवण करून देत आहेत. भारतीय चाहते वॉनला कोहलीच्या कर्णधारपदाची आठवण करून देत असून विराटने त्याच्या कर्णधारपदाखाली कसोटी पुनरुज्जीवित करण्याचे काम केले आहे, असेही म्हणत आहेत. लॉर्ड्स कसोटी सामन्यात कोहलीच्या आक्रमक कर्णधारपदाने कसोटी क्रिकेट रोमांचक केले होते हे कदाचित तुम्हाला आठवत नसेल. एवढेच नाही तर लोकांनी त्याला अॅडलेड कसोटीची आठवणही करून दिली आहे. सोशल मीडियावर वॉनच्या या ट्विटनंतर भारतीय चाहते सतत प्रतिक्रिया देत आहेत.