बॅडमिंटनचे राष्ट्रीय प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्याविरुद्ध पक्षपातीपणाचा आरोप करीत त्यांना न्यायालयात खेचणाऱ्या प्राजक्ता सावंतला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिलासा दिला. पुढील स्पर्धासाठी प्राजक्ताचा गेल्या दोन वर्षांचा खेळ पाहून तिची निवड करण्यात यावी. आणि तिची निवड करताना गोपीचंद यांना प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचे आदेश न्यायालयाने अखिल भारतीय बॅडमिंटन असोसिएशनला दिले.
मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती अनूप मोहता यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी प्राजक्ताने पुन्हा एकदा गोपीचंद यांच्यावर पक्षपातीपणाचे आरोप केले. केवळ त्यांच्याच अकादमीच्या खेळाडूंची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी निवड केली जात असल्याच्या आरोपाचा तिने या वेळी पुनरुच्चार केला. तसेच केवळ त्यांच्यामुळेच कोणीही खेळाडू आपल्यासोबत खेळण्यास तयार नसल्याचेही तिने न्यायालयाला सांगितले. त्यावर गोपीचंद यांच्यातर्फे या आरोपांचे खंडन करण्यात आले. प्राजक्ता असेच आरोप आपल्यावर, सहकाऱ्यांवर आणि बॅडमिंटन असोसिएशनवर करीत राहिली, तर कसे कोणी हिच्यासोबत काम करेल, असा सवालही उपस्थित केला. मात्र तिने जर आरोप मागे घेतले, तर आपण प्रशिक्षक म्हणून तिच्यासोबत काम करण्यास अजूनही तयार असल्याचे गोपीचंद यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने प्राजक्ताचा गेल्या दोन वर्षांच्या खेळ पाहून तिची निवड करावी आणि तिच्या निवड प्रक्रियेच्या वेळी निवड समितीचे सदस्य असलेल्या गोपीचंद यांना दूर ठेवावे, असे आदेश दिले.दरम्यान, राज्य सरकारतर्फे प्राजक्ताला पुरस्कर्ते म्हणून तीन लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती या वेळी न्यायालयाला देण्यात आली.

Story img Loader