सचिनची १९९ वी कसोटी दणक्यात साजरी करण्याचा बंगाल क्रिकेट असोसिएशनचा प्रयत्न आहे. मात्र सचिनोत्सव साजरा करताना घाईघाईत त्यांच्या हातून घडणाऱ्या चुकांमुळे स्वत: सचिन तेंडुलकर आणि आता भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी नाराज झाला आहे. ईडन गार्डन्सवर झळकणाऱ्या एका मोठय़ा बोर्डवर सचिनचे नाव झळकत आहे. मात्र त्यात सचिनचे नाव चुकीचे लिहिले आहे. सचिनचे नाव कसे चुकते, असा सवाल धोनीने पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी केला आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनला चपराक लगावली.  मैदानावर सचिनचे नाव कुणी चुकवले? ही चूक नव्हे घोडचूक आहे. भर मैदानात मोठय़ा अक्षरांत ही चूक झाली आहे अशा शब्दांत धोनीने या चुकीचा समाचार घेतला. जोगेने चौधरी यांनी तयार केलेल्या बोर्डावर सचिनच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे लिहिण्यात आले आहे. या गोंधळामुळे बंगाल क्रिकेट असोसिएशनची नामुष्की झाली आहे. ईडन गार्डन्स मैदानावर सगळीकडे सचिनचे कटआऊट्स लावण्यात आले आहेत. सचिनच्या कारकिर्दीतील लक्षवेधी क्षणांचा वेध घेणारा सचिनरथ कोलकाता शहरात फिरत आहे. सचिनला मानवंदना देण्यासाठी सचिनचा मेणाचा पुतळा भारतीय संघाच्या ड्रेसिंगरूमच्या बाहेर ठेवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त मैदानावर दाखल होणाऱ्या प्रेक्षकांना सचिनची पुस्तिका आणि मुखवटा देण्यात येणार आहे. अवघा माहौल सचिनमय करण्याचा बंगाल क्रिकेट असोसिएशनचा प्रयत्न प्रत्यक्ष सचिन तेंडुलकरला मात्र आवडलेला नाही. क्रिकेट हा अकरा खेळाडूंतर्फे खेळला जाणारा खेळ आहे. माझ्याबरोबरच संघातील अन्य खेळाडूही तितकेच महत्त्वाचे आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, उमेश यादव, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, प्रग्यान ओझा आणि अमित मिश्रा.
वेस्ट इंडिज : डॅरेन सॅमी (कर्णधार), ख्रिस गेल, कायरन पॉवेल, डॅरेन ब्राव्हो, मालरेन सॅम्युअल्स, नरसिंग देवनारायण, शिवनारायण चंदरपॉल, दिनेश रामदिन (यष्टीरक्षक), टिनो बेस्ट, वीरसामी पेरुमल, शेल्डॉन कोटेरेल, किर्क एडवर्ड्स, केमार रोच, शेन शिलिंगफोर्ड आणि चँडविक वॉल्टन.
वेळ : सकाळी ९ वा. पासून.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स -३ वाहिनीवर.

Story img Loader