Ranji Trophy Final Highlights VID vs KER in Marathi: रणजी ट्रॉफी २०२४-२५ चा अंतिम सामना विदर्भ वि. केरळ या संघांमध्ये खेळवला जात आहे. हा अंतिम सामना आज म्हणजेच २६ फेब्रुवारीपासून नागपूरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशीच विदर्भच्या संघाने सुरूवातीला झटपट ३ विकेट्स गमावले पण संघाच्या २१ वर्षीय खेळाडूने संघाचा डाव सावरत शतकी खेळी केली. पण हा २१ वर्षीय खेळाडू दानिश मलेवार आहे तरी कोण, जाणून घेऊया.

विदर्भचा फलंदाज दानिश मलेवारने रणजी ट्रॉफी २०२५ च्या अंतिम फेरीत पहिल्याच दिवशी शतक झळकावले. त्याने पहिल्या दिवशी १६८ चेंडूत शतकी खेळी पूर्ण केली. केरळने अंतिम सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उजव्या हाताच्या फलंदाज असलेल्या दानिशने सुरूवातीच्या षटकांपासून चांगली सुरूवात केली. विदर्भाला हिरव्या खेळपट्टीमुळे सुरूवातीलाच ३ धक्के मिळाले. या खेळपट्टीने पहिल्या सत्रात वेगवान गोलंदाजांना मदत केली.

फलंदाजीच्या क्रमात थोडा बदल करत अक्षय वाडकरच्या संघाने खालच्या फळीतील फलंदाज पार्थ रेखाडे आणि दर्शन नळकांडे यांना नव्या चेंडूचा सामना करण्यासाठी सलामीसाठी पाठवले. केरळच्या वेगवान गोलंदाजांनी १२ षटकांत ३ विकेट घेतले. यासह यजमान संघाची धावसंख्या ३ विकेटवर २५ धावा झाली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मलेवार आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या करुण नायरने महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.

करूण नायरबरोबरची ही भागीदारी पुढे नेत मलेवारने चालू मोसमातील दुसरे शतक झळकावले. त्याचा विदर्भासाठी हा पहिलाच हंगाम आहे. डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटेच्या चेंडूवर षटकार ठोकून ९९ धावा केल्यानंतर मलेवारने मिड-विकेटवर चौकार ठोकून शतक पूर्ण केले.

कोण आहे दानिश मलेवार?

दानिश मलेवारने रणजी हंगामापूर्वी नागपूर येथे आंध्रविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दुसऱ्या डावात ६१ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने पुढील तीन डावात ५६, ४२ आणि ५९ धावा केल्या आणि त्यानंतर नागपुरात गुजरात विरुद्ध घरच्या मैदानावर पहिले प्रथम श्रेणी शतक (११५) केले.

२१ वर्षीय मलेवार, ज्याने अद्याप लहान फॉरमॅटमध्ये पदार्पण केले नाही, या महिन्याच्या सुरुवातीला रणजी बाद फेरीच्या सुरुवातीपासून फॉर्ममध्ये आहे. उपांत्यपूर्व फेरीत तामिळनाडूविरुद्ध ७५ आणि ० धावा केल्यानंतर मलेवारने उपांत्य फेरीत मुंबईविरुद्ध ७९ आणि २९ धावा करून मोलाचे योगदान दिले. आता अंतिम फेरीत त्याने शतक झळकावत संघाचा डाव सावरला आहे.

दानिश मलेवारचे वडील विष्णू यांना क्रिकेटचं वेड आहे. मुलगा झाला तर त्याला क्रिकेटर बनवायचे, असे त्यांनी लग्नाच्या वेळीच ठरवले होते. पण मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने विष्णू मलेवार यांच्यासाठी हे स्वप्न साकार करणार सोपं असणार नाही, याची त्यांना कल्पना होती.

उपांत्य फेरीदरम्यान मलेवार म्हणाला होता, “माझ्या वडिलांची नेहमीच इच्छा होती की मी क्रिकेटर व्हावे आणि मी सात वर्षांचा असताना एका अकादमीत प्रवेश घेतला. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला पण माझ्या क्रिकेटच्या गरजा पूर्ण केल्या जातील याची जबाबदारी त्यांनी घेतली होती. मी जेव्हा ज्युनियर लेव्हलला क्रिकेट खेळू लागलो तेव्हा मी चांगल्या धावा केल्या की काही जण मला ग्लोव्हज, बॅट आणि पॅड द्यायचे. मी अंडर-१९ क्रिकेट खेळू लागल्यानंतरच मला पैसे मिळू लागले.

Story img Loader