Who is Gurjapneet Singh Tamilnadu Pacer Who Took Wickets of Virat Kohli and Cheteshwar Pujara: सध्या रणजी ट्रॉफीचे सामने खेळवले जात आहेत. चॅम्पियन मुंबई क्रिकेट संघाचा बडोदा संघाने पराभव केला तर असे अनेक रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. पण यादरम्यान तमिळनाडू संघाचा वेगवान गोलंदाज गुरजपनीत सिंह हा चर्चेचा विषय ठरला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहरासारख्या अॅक्शनसह गोलंदाजी करणाऱ्या या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने रविवारी (१३ ऑक्टोबर) तमिळनाडूसाठीच्या रणजी पदार्पणाच्या सामन्यात सौराष्ट्रविरुद्ध आपल्या भेदक गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याने अनुभवी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराला शून्यावर बाद केले.
एमए चिदंबरम स्टेडियमवर बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या शिबिरात गुरजपनीत सिंह हा नेट गोलंदाज होता, त्याने विराट कोहलीला नेटमध्ये सराव करताना बाद केले. विराटला बाद केल्यानंतर त्याने सेलिब्रेशन केले नाही, पण बाद झाल्यानंतर कोहलीने त्याच्याकडे असा एक कटाक्ष टाकला, जे डाव्या हाताचा हा वेगवान गोलंदाज नक्कीच कधी विसरणार नाही. त्यानंतर कोहलीने स्ट्रेट ड्राइव्हने त्याला प्रत्युत्तर दिले. या सराव सत्राच्या शेवटी भारताच्या माजी कर्णधाराने या युवा वेगवान गोलंदाजाबरोबर चर्चा करताना दिसला.
गुरजपनीतने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, “विराटला गोलंदाजी केल्यानंतर मी त्याच्याकडे पाहिले आणि पुन्हा पाहण्याचे धाडस करू शकलो नाही. तो खूप जास्त रागावला होता. पण मला जाणवलं की तो इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा स्वतःवरच जास्त रागावला होता. स्ट्रेट ड्राइव्हनंतर त्याने पुन्हा माझ्याकडे पाहिले आणि हसला. विशेष म्हणजे कोहलीने गुरजपनीतला एक महत्त्वाचा सल्ला दिला. गुरपनीत विराटच्या सल्ल्याबद्दल सांगताना म्हणाला, “त्याने मला सांगितले की जेव्हा कोणतीही हालचाल होत नसते तेव्हा अँगल बदल आणि अराऊंड द विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न कर. कारण त्या अँगलने गोलंदाजी करताना चेंडू मुव्ह करण्याची संधी मिळेल आणि फलंदाजांना याचा नक्कीच त्रास जाणवेल.
गुरजपनीतने सौराष्ट्र संघाला दिले लागोपाठ धक्के
रविवारी सूर्यप्रकाशामुळे एसएनआर कॉलेजची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल ठरली नाही. गुरजपनीत नवीन चेंडूने गोलंदाजी करताना अराऊंड द विकेट गोलंदाजी करत होता. आशिष नेहरासारखीच वेगवान आर्म ॲक्शन असलेल्या या वेगवान गोलंदाजाने रणजी ट्रॉफी सामन्यात सौराष्ट्राच्या टॉप ऑर्डरच्या फळीला झटपट तंबूत धाडले. या सामन्यात गोलंदाजी करताना गुरजपनीतने ९ षटकांमध्ये फक्त ७ धावा देत ४ विकेट घेतले. तर सौराष्ट्रच्या दुसऱ्या डावात गुरजपनीतने ५ मेडन षटकं टाकली. मुसळधार पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ लवकर संपला, तेव्हा सौराष्ट्रची दुसऱ्या डावाची धावसंख्या ५ बाद ३५ अशी होती.
रणजी ट्रॉफीतील पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या डावात गुरजपनीतला एकही विकेट मिळाली नाही. पण गुरजपनीतने दुसऱ्या डावात दाखवून दिले की आयपीएल स्काउट्समध्येही त्याच्याबद्दल खूप चर्चा का आहे. २० मिनिटांच्या पावसाच्या विश्रांतीनंतर गुरजपनीतने चौथ्या षटकात चिराग जानीची पहिली विकेट घेतली. पण चेतेश्वर पुजाराच्या विकेटने सौराष्ट्रच्या संघाची पार कंबरडे मोडले.
गुरजपनीतने षटकाची सुरुवात अराऊंड द विकेट गोलंदाजी करत बाउन्सरने सुरूवात केली, ज्यावर पुजारा गोंधळला. यानंतर त्याने गुड लेन्थ बॉल टाकला आणि नंतर एक बाउन्सर टाकला. शेवटी गुरजपनीतने अखेरच्या चेंडूवर कोहलीने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे गोलंदाजी केली आणि पुजारा शून्यावर पायचीत झाला आणि गुरजपनीतला मोठी विकेट मिळाली. गुरजपनीतच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर तमिळनाडू संघाने सौराष्ट्र संघावर डाव आणि ७० धावांनी विजय मिळवला.