नवीन वर्ष, पहिलीवहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा आणि या स्पर्धेचे जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज झालेले टेनिसपटू. नव्या वर्षांत हे मानाचे ग्रँड स्लॅम जेतेपद आपल्या नावावर असावे यासाठी पुढील काही दिवस जबरदस्त मुकाबला पाहायला मिळणार आहे. रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच, अँडी मरे पुरुषांमध्ये तर महिलांमध्ये सेरेना विल्यम्स, मारिया शारापोव्हा, व्हिक्टोरिया अझारेन्का हे जेतेपदाच्या शर्यतीत आहेत. सहा जणांच्या चमूवर तमाम भारतीयांच्या आशा आहेत. ग्रँड स्लॅम सोहळ्याचा घेतलेला हा वेध झ्र्
नोव्हाक जोकोव्हिच : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जोकोव्हिच सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या जेतेपदासाठी तय्यार आहे. गेल्या वर्षी राफेल नदालला पाच तास आणि ५४ मिनिटांच्या ऐतिहासिक लढतीत नमवल्यानंतर जोकोव्हिचने जेतेपद आपलेसे केले होते. या यशाची पुनरावृत्ती साधत जेतेपदाची हॅट्ट्रिक करण्याचा त्याचा इरादा असेल. जोकोव्हिचला गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेनंतर ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्यात अपयश आले होते. रॉजर फेडरर आणि अँडी मरे या बलाढय़ प्रतिस्पध्र्याना चीतपट केल्यानंतरच जोकोव्हिचचे जेतेपदाचे स्वप्न साकारू शकते.
रॉजर फेडरर : तिशी म्हणजे टेनिसच्या परिभाषेत कारकिर्दीची अखेर होण्याची वेळ. मात्र ३१ वर्षीय रॉजर फेडरर या सगळ्या समजुतींना अपवाद आहे. खेळण्याची, जिंकण्याची फेडररची भूक जराही कमी झालेली नाही. गेल्या वर्षी विम्बल्डनचे जेतेपद कमावत फेडररने क्रमवारीत पुन्हा अव्वलस्थानी झेप घेतली. कलात्मक आणि दर्जेदार खेळ, ठेवणीतला एकहाती बॅकहँडचा फटका, जेतेपदाचा चषक उंचावताना त्याच्या चेहऱ्यावर उमटणारे अतीव समाधान हे सगळं अनुभवण्यासाठी फेडररचे चाहते सज्ज झाले आहेत. जेतेपदापर्यंत पोहोचण्यात फेडररसमोर खरे आव्हान ते अँडी मरेचे. नव्या दमाच्या, युवा खेळाडूंच्या तडफेसमोर फेडरर प्रदीर्घ अनुभवासह बाजी मारणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे.
राफेल नदाल : जेतेपद पटकावण्यासाठी शर्यतीत असणारा राफेल नदाल दुखापतीमुळे यंदाच्या स्पर्धेला मुकणार आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे टेनिसपासून बऱ्याच कालावधीपासून लांब असलेला नदाल ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदासह दणक्यात पुनरागमन करेल अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र गुडघ्यानंतर नदाल पोटाच्या विकाराने त्रस्त असल्याने नदालने माघार घेतली आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे जिगरबाज आणि रांगडा खेळासाठी ओळखला जाणारा आणि तासन्तास चालणाऱ्या सामन्यातही त्वेषाने लढणारा नदाल पाहायला मिळणार नाही ही खंत टेनिसरसिकांना आहे.
अँडी मरे : इंग्लंडची आशा असलेल्या अँडी मरेने २०१२ वर्ष आपल्या यशाने संस्मरणीय ठरवले. ऑलिम्पिक सुवर्णपदक आणि अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदासह ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या मांदियाळीत स्थान मिळवण्यासाठी पात्र आहोत हे सिद्ध केले. गुणवत्ता असूनही मोक्याच्या क्षणी कच खाणारा खेळाडू अशी हेटाळणी होणाऱ्या मरेने गेल्या वर्षी धवल यशाने टीकाकारांची तोंडे बंद केली. गेल्या वर्षी मिळवलेले यश हा चमत्कार नाही हे दाखवून देण्याची संधी मरेला ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या निमित्ताने मिळणार आहे.
सेरेना विल्यम्स : दुखापती, अपघात आणि वैयक्तिक आयुष्यातील कटू प्रसंग हे सगळं बाजूला ठेवून सेरेनाने दुसरी इनिंग्ज सुरू केली. प्रचंड ताकदवान खेळाला तंदुरुस्तीची जोड देत सेरेनाने गेल्या वर्षी चार महत्त्वाच्या जेतेपदांवर कब्जा केला. तिच्या झंझावातापुढे टिकणे हे अन्य महिला खेळाडूंसाठी मोठेच आव्हान ठरणार आहे.
व्हिक्टोरिया अझारेन्का: गतविजेत्या अझारेन्काला पुन्हा इतिहास घडवण्याची संधी आहे. क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली अझारेन्का सुसाट फॉर्ममध्ये आहे मात्र तिच्यासमोर खरा अडथळा असणार आहे तो सेरेना विल्यम्सचा.
मारिया शारापोव्हा : गेल्या वर्षी ग्रँड स्लॅम विजयांचे वर्तुळ पूर्ण करणारी शारापोव्हा दुखापतींच्या फेऱ्यातून बाहेर पडत आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे. या सोहळ्यात सहा भारतीय टेनिसपटू सहभागी होणार आहेत. लिएण्डर पेस, रोहन बोपण्णा, महेश भूपती दुहेरीत तर सोमदेव देववर्मन एकेरीत नशीब अजमावणार आहेत. युवा युकी भांब्रीला पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागणार आहे. सानिया मिर्झाने नुकतेच बेथानी मॅटेक सॅण्डसच्या साथीने ब्रिस्बेन स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. या जेतेपदासह क्रमवारीत अव्वल स्थान गाठणाऱ्या सानियाला यशाची पुनरावृत्ती करायला आवडेल.

Story img Loader