Manu Bhaker wons bronze medal in Paris Olympics 2024 : नेमबाज मनू भाकेरने रविवार २८ जुलै रोजी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ पदक जिंकून इतिहास रचला. हरियाणाची २२ वर्षीय नेमबाज मनूने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत तिसरे स्थान मिळवून या गेम्समध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. टोकियोमधील अपयशानंतर तिने जबरदस्त पुनरागमन करत कांस्यपदकावर नाव कोरले. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात दक्षिण कोरियाच्या दोन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. ओ ये जिनने सुवर्णपदक जिंकले आणि किम येजीने रौप्य पदक जिंकले. आता भारताला पहिलं पदक जिंकून देणारी मनू भाकेर कोण आहे? जाणून घेऊया.
नेमबाज मनू भाकेरने पात्रता फेरीत तिसरे स्थान पटकावले होते. यासह तिने नेमबाजीत भारताचा १२ वर्षांचा पदकांचा दुष्काळही संपवला. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये गगन नारंग आणि विजय कुमार यांनी नेमबाजीत पदके जिंकली होती. नेमबाजीतील भारताचे हे पाचवे पदक आहे. मनूपूर्वी चारही खेळाडू पुरुष होते. आता मनू राजवर्धन सिंग राठोड, अभिनव बिंद्रा, गगन नारंग आणि विजय कुमार यांच्या क्लबमध्ये सामील झाली आहे.
कोण आहे मनू भाकेर?
मनू भाकेर हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावातील रहिवासी आहे. २०१८ आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत मनूने भारतासाठी दोन सुवर्णपदके जिंकली होती. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती सर्वात तरुण भारतीय महिला नेमबाज राहिली आहे. वयाच्या १६ व्या वर्षी मनूने २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी दोन सुवर्णपदके जिंकली. तिच्या पिस्तूलमध्ये बिघाड झाल्यामुळे ती टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पदक जिंकू शकली नव्हती.
हेही वाचा – Paris Olympic 2024 : मनू भाकेरने कांस्यपदक जिंकून रचला इतिहास, नेमबाजीत भारताला मिळवून दिले पहिले पदक
मनूने ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि ७० राष्ट्रीय पदके जिंकली आहेत. २०२१ च्या ऑलिम्पिकमध्ये ती सातव्या स्थानावर राहिली. २०२३ मध्ये मनूने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अनेक वैयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेणारी २२ सदस्यीय भारतीय नेमबाजी संघातील ती एकमेव खेळाडू आहे. हरियाणातील झज्जर येथे जन्मलेल्या मनू भाकरने शालेय जीवनात टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंगसह अनेक खेळांमध्ये भाग घ्यायची. विशेष म्हणजे बॉक्सिंग खेळताना मनूच्या डोळ्याला दुखापत झाली. ज्यामुळे तिचा बॉक्सिंगमधील प्रवास संपुष्टात आला.
मनूने २०१८ मध्ये दोन सुवर्णपदकं जिंकली –
मनूला बॉक्सिंग व्यतिरिक्त इतरही वेगळ्या खेळांची आवड होती, ज्यामुळे ती एक उत्कृष्ट नेमबाज बनण्यात यशस्वी झाली. आता तिने देशासाठी पदक जिंकलं आहे. कधी कबड्डीच्या क्षेत्रात मनूने प्रवेश केला तर कधी कराटेमध्ये हात आजमावला. प्रामुख्याने नेमबाजीची निवड करण्यापूर्वी मनू स्केटिंग, मार्शल आर्ट्स, कराटे, कबड्डी खेळत असे. वयाच्या १६ व्या वर्षी, मनूने २०१८ मध्ये आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि दोन सुवर्णपदके जिंकली. त्याच वर्षी मनूने राष्ट्रकुल खेळ आणि युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला. मनूने दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदके पटकावली.
हेही वाचा – Paris Olympic 2024 Live Updates: पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी
नववीपर्यंत डॉक्टर होण्याचे होते स्वप्न –
मनूचे वडील राम किशन भाकेर यांनी तिला नेहमीच पाठिंबा दिला. ज्या खेळात तिला प्रगती करावीशी वाटली त्या खेळात तिला प्रगती करू दिली. अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे मनूलाही ती नववीत असताना डॉक्टर व्हायचे होते. ती सुरुवातीपासूनच खेळात चांगली होती पण तिचे मुख्य लक्ष अभ्यासावर होते. इयत्ता दहावीला असताना मनूच्या आयुष्याला वेगळं वळण लागलं, जेव्हा वर्गात प्रथम येण्याबरोबर तिची नेमबाजीसाठी राष्ट्रीय संघात निवड झाली. तिचे प्रशिक्षक अनिल जाखड यांच्या सल्ल्यानुसार, १६ वर्षांची म्हणजे अकरावीला असताना आयएसएसएफ विश्वचषक, राष्ट्रकुल खेळ आणि युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपली वेगळी ओळख निर्माण केली.