आयपीएल 2021च्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे. हंगामाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात येत आहे. नाणेफेकीचा कौल बंगळुरूच्या बाजूने लागल्यानंतर विराट आणि रोहितने आपापल्या अंतिम अकरा सदस्यांची घोषणा केली.

आज मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाथन कुल्टर नाईल आणि अ‍ॅडम मिलने यांसारख्या गोलंदाजांकडे दुर्लक्ष करून दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जानसेनला आय़पीएल2021च्या उद्धाटनाच्या सामन्यात खेळण्याची संधी दिली. 20 वर्षीय जानसेनचे स्थान पक्के झाल्यानंतर तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

 

सहा फूट आठ इंच लांबीचा मार्को जानसेन हा डावखुरा वेगवान गोलंदाज तसेच स्फोटक फलंदाज आहे. आपल्या उंचीचा फायदा करत जानसेन प्रतिस्पर्ध्याला बुचकळ्यात टाकतो. त्याचबरोबर त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे तो संघासाठी प्रभावी ठरू शकतो. जानसेनच्या या प्रतिभेचा विचार करता मुंबई इंडियन्सने त्याला आयपीएल 2021च्या लिलावात 20 लाख रुपयांमध्ये संघात दाखल केले.

जानसेनची क्रिकेट कारकीर्द

आयपीएल लिलावानंतर, जानसेनने घरगुती टी-20 सामन्यात अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक झळकावले. मार्को जानसेनने आतापर्यंत 10 टी-20, 13 लिस्ट ए आणि 14 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. टी-20 मध्ये त्याने 71 धावा आणि 6 बळी, लिस्ट एमध्ये 112 धावा आणि 16 बळी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 440 धावा आणि 54 बळी मिळवले आहेत. जानसेनची प्रतिभा पाहता तो दक्षिण आफ्रिका क्रिकेटचा भविष्यकाळ मानला जातो. लवकरच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकेल.

Story img Loader