Neetu David joins ICC Hall of Fame : माजी भारतीय फिरकीपटू नीतू डेव्हिड यांना काही दिवसांपूर्वी आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले. त्या आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला क्रिकेटपटू ठरल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्स आणि महान इंग्लिश फलंदाज ॲलिस्टर कूकसह त्यांना हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाले आहे. यानंतर ॲलिस्टर कूक आणि नीतू डेव्हिड यांनी महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनलला हजेरी लावली. त्यामुळे नीतू डेव्हिड नक्की कोण आहेत आणि त्यांचे कार्य काय आहे? जाणून घेऊया.
डावखुरा फिरकीपटू नीतू यांनी भारतासाठी १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने (१० कसोटी आणि ९७ वनडे) खेळले आहेत. नीतू आता आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये भारताच्या माजी महान महान डायना एडुलजीसह सामील झाल्या आहेत, ज्यांना प्रथमच आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले होते. ६८ वर्षीय एडुलजी या गेल्या नोव्हेंबरमध्ये सामील झालेल्या पहिल्या महिला होत्या.
कोण आहे नीतू डेव्हिड?
नीतू डेव्हिड या यूपीच्या कानपूरची रहिवासी आहेत. भारतीय संघाव्यतिरिक्त ती रेल्वेकडूनही खेळल्या आहेत. ४७ वर्षीय नीतू एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४१ विकेट्ससह भारताची दुसरी सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्सचा आकडा गाठणारी ती देशातील पहिली महिला गोलंदाज आहे. २००५ च्या विश्वचषकातील सर्वात यशस्वी गोलंदाज नीतू यांनी भारताला प्रथमच अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
वयाच्या १७ व्या वर्षी केले होते पदार्पण –
वयाच्या १७ व्या वर्षी नीतू यांनी १९९५ मध्ये नेल्सनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. १९९५ मध्ये, जमशेदपूर येथे इंग्लंडविरुद्ध भारताचा दोन धावांनी पराभव झाला, ज्यामध्ये त्यांनी ५३ धावांत आठ विकेट्स घेतल्या होत्या. ही महिला कसोटीतील एका डावातील सर्वोत्तम वैयक्तिक गोलंदाजी आहे.
हेही वाचा – IND vs NZ : ‘आम्हीही नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम…’, ऐतिहासिक विजयानंतर न्यूझीलंडच्या कर्णधाराचा मोठा खुलासा
नीतू डेव्हिड यांची कारकीर्द –
नीतू डेव्हिड यांनी १० कसोटीत ४१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर ९७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १६.३४ च्या सरासरीने १४१ विकेट्स घेतल्या. नीतू यांनी २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतली होती, परंतु दोन वर्षांनंतर त्यांनी आपला निर्णय बदलला आणि आशिया कप आणि भारताच्या इंग्लंड दौऱ्यात एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळल्या. महिला कसोटीच्या एका डावात पाच विकेट्स घेणारी ती सर्वात तरुण (१८ वर्षे ८४ दिवस) गोलंदाज आहे.