Who is Sairaj Bahutule: भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरूद्धच्या टी-२० आणि वनडे मालिकेसाठी (IND vs SL) श्रीलंकेला पोहोचली आहे. भारतीय संघात सध्या नवीन बदल झालेले पाहायला मिळत आहे. बदलांमधून जाणाऱ्या टीम इंडियाला टी-२० मध्ये रोहित शर्माचा उत्तराधिकारी मिळाला आहे. तर भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कार्यकाळ या मालिकेपासून सुरू होत आहे. गंभीरच्या कोचिंग स्टाफमध्ये जुने क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांचे स्थान कायम आहे, तर माजी भारतीय अष्टपैलू अभिषेक नायर आणि नेदरलँड्सचे रायन टेन डेशॉट हे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून संघात सामील झाले आहेत. दरम्यान, गोलंदाजी प्रशिक्षकावर एकमत न झाल्याने साईराज बहुतुले यांची श्रीलंका दौऱ्यासाठी हंगामी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पण साईराज बहुतुले नेमके आहेत तरी कोण, जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Rahul Dravid: पुन्हा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार राहुल द्रविड? KKR नव्हे तर ‘या’ संघासह IPL मध्ये करणार पुनरागमन

IND vs SL: कोण आहेत साईराज बहुतुले?

जादुई फिरकीपटू साईराज बहुतुले हे देशांतर्गत क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. साईराज यांचा जन्म ६ जानेवारी १९७३ रोजी मुंबईत झाला. या माजी डावखुरा फिरकीपटूने १८८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २६ च्या सरासरीने ६३० विकेट घेतल्या आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये त्यांच्या नावावर ४०५ विकेट्स आहेत. त्यांचा फलंदाजीतील रेकॉर्डही चांगला आहे. बहुतुले यांनी नऊ शतके आणि २६ अर्धशतकांसह ६१७६ धावा केल्या आहेत. त्यांनी १४३ लिस्ट ए सामन्यात १९७ विकेट घेतल्या. इतका उत्कृष्ट रेकॉर्ड असूनही त्यांना भारतीय संघात फारशा संधी मिळाल्या नाहीत.

हेही वाचा – अभिनव बिंद्रा यांना प्रतिष्ठित ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ पुरस्कार जाहीर, ४१ वर्षांनंतर भारतीय व्यक्तीला मिळणाऱ्या ‘या’ अवॉर्डची काय आहे खासियत?

१९९७-९८ च्या इराणी चषक स्पर्धेत वयाच्या २४व्या वर्षी १३ विकेट्स घेऊन सगळीकडे खळबळ उडवणाऱ्या साईराज बहुतुलेला त्याचवर्षी भारताकडून श्रीलंकेविरुद्ध पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी सचिन तेंडुलकर टीम इंडियाचा कर्णधार होता. बहुतुलेचे कसोटी पदार्पण २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाले होते. अनिल कुंबळेसारख्या प्रस्थापित फिरकीपटूंमुळे साईराज बहुतुले भारतीय संघात कायमस्वरूपी स्थान मिळवू शकले नाहीत. साईराज बहुतुले यांनी १९९७ ते २००३ या कालावधीत भारतासाठी दोन कसोटी आणि आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये सहभागी झाले होते.

१ जानेवारी २०१३ रोजी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी कोचिंगच्या दिशेने मोर्चा वळवला. जून २०१४ मध्ये केरळ क्रिकेट संघाचे प्रशिक्षक बनले होते. त्यानंतर जुलै २०१५ मध्ये ते बंगाल क्रिकेट संघाचे प्रशिक्षक बनले. फेब्रुवारी २०१८ मध्ये, त्यांनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली. आता टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is sairaj bahutule india interim bowling coach for the sri lanka series ind vs sl bdg