IND vs AUS Who is Sam Konstas: ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित २ सामन्यांसाठी आपला कसोटी संघ जाहीर केला, ज्यामध्ये १९ वर्षीय युवा फलंदाज सॅम कोन्स्टासचा संघात समावेश केला आहे. भारताविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये सॅम उस्मान ख्वाजासोबत संघासाठी सलामी देऊ शकतो, असे मानले जात आहे. याआधी मॅकस्विनीवर सलामीची जबाबदारी देण्यात आली होती, मात्र तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही.
सॅम हा न्यू साउथ वेल्सचा क्रिकेटपटू असून भारताविरुद्ध पुढील दोन कसोटी सामने खेळत त्यात चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी त्याच्यावर असणार आहे. दडपणाखाली सॅम चांगली कामगिरी करू शकेल, असा विश्वास क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आता कसोटी फॉरमॅटसाठी सलामीवीराच्या शोधात आहे आणि सॅमला संधी देणे हा योजनेचा एक भाग आहे. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये सॅमचा आतापर्यंतचा रेकॉर्ड प्रभावी आहे.
हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या संघात मेलबर्न-सिडनी कसोटीसाठी दोन मोठे बदल, १९ वर्षीय खेळाडूला दिली संधीहेही वाचा –
डिसेंबर २०२४ मध्ये, त्याने बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडरसाठी पदार्पण केले आणि डेव्हिड वॉर्नरसोबत सलामी देताना त्याने २६ चेंडूत ५७ धावांची तुफानी इनिंग खेळली, जे सिडनी थंडरच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक होते. त्याच्या खेळीत आठ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता, ज्याने ॲडलेड स्ट्रायकर्सवर संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
भारताविरुद्ध मनुका ओव्हल येथे झालेल्या गुलाबी चेंडूच्या सराव सामन्यात सॅमने प्राईम मिनिस्टर इलेव्हनकडूनही खेळला होता. त्याने या सामन्यात भारतीय गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध ९७ चेंडूत १४ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने १०७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या या कामगिरीनंतर त्याच्याकडे ऑस्ट्रेलियाचा भावी क्रिकेटर म्हणून पाहिले जात आहे.
यापूर्वी, सॅम ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया अ संघाकडून भारत अ विरुद्ध खेळला होता. भारत अ विरुद्धच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात, त्याने दुसऱ्या डावात आपल्या संघासाठी ७३ धावांची नाबाद खेळी केली, ज्यामुळे त्याच्या संघाच्या विजयात त्याने मोलाची भूमिका बजावली होती.
क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये यावर्षी ७३६ धावा करणाऱ्या सॅमसाठी, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने कसोटी संघात त्याच्या समावेशा करावा अशी गळ घातली होती आणि त्याला एक निडर व स्थिर फलंदाज म्हटले होते. सॅमने आतापर्यंत ११ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४२.२३ च्या सरासरीने ७१८ धावा केल्या आहेत. जर त्याला मेलबर्नमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली, तर तो पॅट कमिन्स आणि ॲस्टन आगर यांच्यानंतर किशोरवयीन वयात कसोटी पदार्पण करणारा ऑस्ट्रेलियाच्या गेल्या ४० वर्षांच्या कसोटी इतिहासातील तिसरा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बनेल.
हेही वाचा – Virat-Anushka: विराट-अनुष्का भारत सोडून ‘या’ देशात कायमचे होणार स्थायिक, कोचने दिली धक्कादायक माहिती
ॉ
भारताविरूद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड (उप-कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स केरी, जोश इंग्लिश, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मार्नस लबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, झे रिचर्डसन, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर