Who is Shamar Joseph who played a key role in West Indies historic victory : वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने कांगारूंचा आठ धावांनी पराभव केला. वेस्ट इंडिजने तब्बल २१ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना जिंकला आहे. एवढेच नाही तर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर वेस्ट इंडिजने २७ वर्षांनी कसोटी जिंकली. या विजयासह वेस्ट इंडिजने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. वेस्ट इंडिजच्या या ऐतिहासिक विजयात शामर जोसेफने महत्त्वाची भूमिका बजावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२४ वर्षीय वेगवान गोलंदाज शामर जोसेफने वेस्ट इंडिजच्या विजयात मोलाचे योगदान दिले. शामर जोसेफने दुसऱ्या डावात ६८ धावांत सात बळी घेतले. शामरसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज एकामागून एक बाद होत राहिले. शामरच्या दमदार गोलंदाजीचा ऑस्ट्रेलियन फलंदाजांकडे उपाय नव्हता. केवळ सलामीवीर स्टीव्ह स्मिथच टिकू शकला आणि तो ९१ धावा करून नाबाद परतला. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज शामरची कामगिरीही महत्त्वाची आहे. कारण तो काही तासांपूर्वीच जखमी झाला होता. मिचेल स्टार्कने त्याचा अंगठा जवळपास यॉर्करवर तोडला होता. दोन लोकांचा आधार घेऊन आत जावं लागलं. नशिबाने फ्रॅक्चर झालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पेनकिलर इंजेक्शन घेऊन खेळला आणि ७ बळी घेत मॅन ऑफ द मॅच आणि सीरिज ठरला.

शामरचा गाबापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. गयाना या कॅरिबियन देशातील बारकारा या छोट्याशा शहरात जन्मलेल्या शामर जोसेफने लहानपणापासूनच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. शामर गरीब कुटुंबातून होता, त्यामुळे सरावासाठी त्याच्याकडे चेंडूही नव्हता. शामर फळे (पेरू, सफरचंद, केळी इ.) आणि प्लास्टिक वितळवून त्यापासून गोळे बनवून सराव करत असे. पारंपरिक ख्रिश्चन कुटुंबातून आलेल्या शामरला शनिवार आणि रविवारी क्रिकेट खेळण्याची परवानगी नव्हती. कारण शनिवार आणि रविवारी संपूर्ण कुटुंब चर्चमध्ये प्रार्थना करण्यात व्यस्त असायचे.

हेही वाचा – IND vs ENG 1st Test : “एक संघ म्हणून आम्ही…”, इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली नाराजी

शामरने सुरक्षा रक्षकाचेही काम केले –

सुरुवातीच्या काळात शामर जोसेफ हे जंगलातून लाकूड तोडून आणायचा कारण त्यांचे कुटुंब फर्निचरच्या व्यवसाय करत असे. यानंतर शामरने सुरक्षा रक्षक म्हणूनही काम केले. गेल्या वर्षीच शामरने जानेवारीमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर ही नोकरी सोडली होती. कारण त्याला पूर्णपणे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे होते. शामारची गर्लफ्रेंड ट्रिशनेही त्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला.

सुरक्षा रक्षकाची नोकरी सोडल्यानंतर शामरला गयाना संघात स्थान मिळाले. शामरने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये गयानाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर सप्टेंबर २०२३ मध्ये, त्याला गयाना ॲमेझॉन वॉरियर्सकडून कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) खेळण्याची संधी मिळाली. शामरने पहिल्या पाच प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २१ विकेट घेत निवडकर्त्यांना प्रभावित केले.

हेही वाचा – AUS vs WI : माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूने वेस्ट इंडिजच्या क्षमतेवर उपस्थित केले होते प्रश्न, क्रेग ब्रॅथवेटने दंड दाखवत दिले प्रत्युत्तर

या चमकदार कामगिरीच्या जोरावर शामर जोसेफची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वेस्ट इंडिज संघात निवड झाली. ॲडलेड ओव्हलवरील पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्याने शामार चर्चेत आला. शामरने स्टीव्ह स्मिथला ज्या पद्धतीने बाद केले ते खरोखरच आश्चर्यकारक होते. शामरने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकूण १३ विकेट्स घेतल्या. याशिवाय शामरनेही ५७ धावा केल्या. शामर जोसेफला सामनावीर आणि मालिकावीर खेळाडू म्हणून निवडण्यात आले. जोसेफने सात फर्स्ट क्लास, दोन लिस्ट-ए आणि तितकेच टी-२० सामने खेळले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is shamar joseph who played a key role in west indies historic victory in the gabba test against australia vbm