Who is Sourabh Kumar selected in the Indian squad : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात टीम इंडियाला विराट कोहलीची खूप उणीव भासली होती. आता दुसऱ्या कसोटी सामन्याबाबतही टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. केएल राहुल आणि रवींद्र जडेजा दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. तसेच त्यांच्या जागी सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार यांचा समावेश करण्यात आला आहे. सरफराज खानला सर्वजण ओळखतात, पण आता आपण सौरभ कुमार कोण आहे? जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहे सौरभ कुमार?

सौरभ कुमार हा एक अष्टपैलू खेळाडू आहे, जो डावखुरा फलंदाज आणि संथ डावखुरा ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहे. सौरभ कुमार हा भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील एक उत्कृष्ट खेळाडू आहे. ३० वर्षीय सौरभ कुमार हा उत्तर प्रदेशातील बागपत येथील रहिवासी आहे. त्याने २०१४ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो यूपीच्या वेगवेगळ्या संघांसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे.

सौरभ जेव्हा १० वर्षांचा होता, तेव्हा त्याने दिल्लीत क्रिकेटच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी बरौत, बागपत येथील आपले घर सोडले. प्रशिक्षणासाठी त्याला रेल्वेने ६० किलोमीटरचा प्रवास करावा लागायचा. सुरुवातीला त्याचे वडील रमेश चंद त्याला सोडायला यायचे. नंतर सौरभ स्वतः ये-जा करू लागला. सौरभचे वडील आकाशवाणीच्या आकाशवाणी भवनात कनिष्ठ अभियंता होते.

हेही वाचा – IND vs ENG : पराभवानंतर भारताला आणखी एक धक्का; आयसीसीची जसप्रीत बुमराहवर मोठी कारवाई

२०२१ मध्ये पहिल्यांदा झाली होती निवड –

यूपीचा हा खेळाडू फेब्रुवारी २०२१ मध्ये पहिल्यांदा चर्चेत आला होता. त्यानंतर त्याची इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी नेट गोलंदाज म्हणून निवड झाली. बरोबर एक वर्षानंतर त्याची श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात निवड झाली होती. पण त्याला पदार्पण करता आले नाही. यावेळी त्याची बदली खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. म्हणजे बऱ्याच अंशी त्याला संघात पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरलाही संघात स्थान मिळाले आहे, जो सौरभसाठी संघात स्तान मिळवण्यासाठी प्रतिस्पर्धी ठरू शकतो.

हेही वाचा – IND vs ENG : भारताला दुहेरी झटका! जडेजा-राहुल संघातून बाहेर झाल्याने ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरी –

३० वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज सौरभ कुमार याआधी भारतीय संघाचा भाग होता, परंतु तो आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकला नाही. त्याने ६८ प्रथम श्रेणी सामन्यात २९० विकेट्स घेतल्या आहेत. ६४ धावांत आठ बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. याशिवाय त्याने २७.११ च्या सरासरीने २०६१ धावा केल्या आहेत. १३३ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोन शतके आणि १३ अर्धशतके झळकावली आहेत.

हेही वाचा – IND vs SA : ‘…म्हणून विराट-जडेजाला बॅटने मारण्याची दिली होती धमकी’, माजी क्रिकेटपटू डीन एल्गरचा धक्कादायक खुलासा

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, सौरभ कुमार.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is sourabh kumar selected in the indian squad for the 2nd test against england vbm