Paris Olympics 2024 Who is Yuyi Susaki: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटने जबरदस्त कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पण त्यापू्र्वी झालेल्या राऊंड ऑफ-१६ च्या सामन्यात जपानच्या युई सुसाकीचा पराभव करून संपूर्ण जगाला चकित केले आहे. युई सुसाकीचा विक्रम पाहता प्री-क्वार्टर फायनलमधील विनेशच्या विजयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सुसाकीला पराभूत केल्यानंतर, विनेशला इतका आनंद झाला की तिने कुस्तीच्या मॅटवर संपूर्ण जोशात हा विजय साजरा केला. पण विनेशने केलेला सुसाकीचा हा पराभव इतका मोठा का मानला जात आहे, कोण आहे २५ वर्षीय युई सुसाकी जाणून घेऊया.
युई सुसाकी ही कुस्तीमधील वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू म्हणून ओळखली जाते. सुसाकीने २०१० पासून केवळ ३ लढती गमावल्या आहेत, यावरून सुसाकीला पराभूत करणे किती कठीण होते याचा अंदाज लावला जाऊ शकतो. युई सुसाकी हे कुस्ती विश्वातील एक मोठे नाव आहे. सुसाकी टोकियो ऑलिम्पिकची चॅम्पियन राहिली असून तिने अंतिम फेरीत एकतर्फी विजय मिळवला होता. या सामन्यात तिने एकही गुण दिला नव्हता, तर स्वतः १० गुण मिळवले आणि सामना १०-० अशा फरकाने जिंकला. याशिवाय एकंदरीत तिची कुस्तीतील आकडेवारी चकित करणारी आहे.
हेही वाचा – Vinesh Phogat: विनेश फोगट उपांत्य फेरीत, अवघ्या पाऊण तासात दोन बड्या कुस्तीपटूंना दिला धोबीपछाड, पाहा VIDEO
विनेश फोगटच्या आधी जपानी कुस्तीपटू वगळता इतर कोणत्याही कुस्तीपटूने सुसाकीला पराभूत केले नव्हते. यापूर्वी तिने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्व ८२ बाउट्स जिंकल्या होत्या. बहुतांश सामन्यांमध्ये तिने एकतर्फी विजय मिळवले. गेल्या १० वर्षांत, सुसाकीने ७३३ गुण मिळवले, तर विरोधी शिबिरातील कुस्तीपटूंना केवळ ३४ गुण मिळविण्याची संधी दिली गेली. यावरून सुसाकीचे कुस्तीमध्ये किती वर्चस्व आहे याचा अंदाज लावता येतो.
१ ऑलिम्पिक, ५ वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि २ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण
युई सुसाकीने २०१० पासून १४ वर्षांत केवळ ३ सामने गमावले आहेत. याशिवाय ती चार वेळा वर्ल्ड चॅम्पियनही राहिली आहे. २०१७ मध्ये तने जागतिक चॅम्पियनशिपच्या ४८ किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. यानंतर तिने २०१८, २०२२ आणि २०२३ मध्ये ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. सुसाकी २०१७ आणि २०२४ मध्ये आशियाई चॅम्पियनही राहिली आहे.