India in Champions Trophy 2025 Semi-Final : यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघानं आत्तापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. सलामीच्या सामन्यात बांगलादेशला तर दुसऱ्या लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवत टीम इंडियानं झोकात उपांत्य फेरी अर्थात सेमीफायनल गाठली आहे. पण आता सेमीफायनलचा सामना नॉकआऊट असल्यामुळे तिथे पराभूत झाल्यास टीम इंडियाला गाशा गुंडाळावा लागेल. त्यामुळे या सामन्यात भारताला कुणाशी दोन हात करावे लागणार? यासंदर्भात चर्चा सुरू झाली असून गट ‘ब’ मधील गणितांवर हे मोठ्या प्रमाणावर अवलबून असेल.
कशा असतील सेमीफायनलच्या लढती?
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये गट अ मधील सर्वात वरचा संघ गट ब मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी खेळेल. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये गट अ मधील दुसर्या क्रमांकाचा संघ गट ब मधील पहिल्या क्रमांकाच्या संघाशी खेळेल.
टीम इंडिया पहिल्या दोन सामन्यांत विजयी झाल्यामुळे सध्या गट अ मध्ये दुसऱ्या स्थानावर असून न्यूझीलंड दोन विजयांसह चांगल्या नेट रनरेटच्या जोरावर पहिल्या स्थानी आहे. पण येत्या रविवारी भारत व न्यूझीलंड यांच्यातील या गटातली शेवटची लढत होईल. या लढतीत भारतानं विजय मिळवला, तर भारत गट अ मध्ये पहिल्या क्रमांकावर येईल, तर न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर जाईल.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ गट ‘अ’
देश | सामने | गुण | रनरेट |
न्यूझीलंड | २ | ४ | ०.८६३ |
भारत | २ | ४ | ०.६४७ |
बांगलादेश | ३ | १ | ०.४४३ |
पाकिस्तान | ३ | १ | १.०८७ |
‘ब’ गटात काय घडतंय?
‘ब’ गटात सध्या मोठी चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया दोन सामन्यांमध्ये तीन गुणांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. अफगाणिस्तान २ सामन्यांमध्ये दोन गुणांसह तिसऱ्या स्थानी आहेत. पण आज ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार असून यात जो संघ जिंकेल, त्याचा सेमीफायनलमधील मार्ग सुकर होऊ शकतो. जर ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानला हरवलं, आणि शनिवारच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडला हरवलं, तर द. आफ्रिका पहिल्या तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी असेल. त्यामुळे भारत न्यूझीलंडविरुद्ध जिंकल्यास भारताचा सेमीफायनलमधील सामना ४ मार्च रोजी ऑस्ट्रेलियाशी होण्याची दाट शक्यता आहे.
न्यूझीलंडविरुद्ध भारत पराभूत झाल्यास…
दरम्यान, रविवारी भारत न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाल्यास टीम इंडिया गट अ मध्ये दुसऱ्या स्थानावर असेल. या स्थितीत गट ‘ब’ मधील पहिल्या क्रमांकाच्या संघाशी भारताचा सामना होईल. या परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेशी भारताला दोन हात करावे लागण्याची शक्यता आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ गट ‘ब’
देश | सामने | गुण | रनरेट |
द. आफ्रिका | २ | ३ | २.१४० |
ऑस्ट्रेलिया | २ | ३ | ०.४७५ |
अफगाणिस्तान | २ | २ | ०.९९० |
इंग्लंड | २ | ० | ०.३०५ |
धक्कादायक निकाल लागल्यास भारत वि. अफगाणिस्तान!
याशिवाय तिसरी शक्यता भारत विरुद्ध अफगाणिस्तान सेमीफायनल सामन्याचीही नाकारता येत नाही. आजच्या सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिल्यास अफगाणिस्तानच्या खात्यात चार गुण होतील. गट ब मधील दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड या शेवटच्या सामन्यात जर इंग्लंड पराभूत झालं तर अफगाणिस्तानचा संघ गट ब मध्ये दुसर्या स्थानी येऊ शकतो. या स्थितीत जर टीम इंडिया न्यूझीलंडला हरवून पहिल्या स्थानी आली, तर सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान असा अनपेक्षित सामना पाहायला मिळू शकतो.
ऑस्ट्रेलियाच्या आशा इंग्लंडवर!
दरम्यान, जर अफगाणिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला, तर ऑस्ट्रेलियाची सारी भिस्त इंग्लंडवर असेल. या स्थितीत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने पराभूत करणं आवश्यक असेल. विजयाचा हा फरक कमी असेल, तरीदेखील मग ऑस्ट्रेलिया सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर असेल.
…तर ऑस्ट्रेलिया थेट सेमीफायनलमध्ये!
अफगाणिस्तानविरुद्धचा ऑस्ट्रेलियाचा सामना पावसामुळे रद्द झाला तर त्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला होईल. कारण सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना एकेक गुण मिळेल. या स्थितीत ऑस्ट्रेलियाकडे अफगाणिस्तानपेक्षा एक गुण जास्त असेल. या स्थितीत जर इंग्लंडन दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने हरवलं, तर दक्षिण आफ्रिका व अफगाणिस्तानचे गुण समान असतील आणि नेट रनरेटच्या जोरावर द. आफ्रिका बाहेर पडून अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये दाखल होऊ शकतं.