|| संतोष सावंत

‘‘तात्यानूं ह्य काय माका पटना नाय! वर्ल्ड कपचो विषयच असो असा की मिया माज्या बापाशीचा पन ऐकूचंय नाय’’ कपाळावर आलेली केसांची झुलपे डाव्या हाताने बाजूला सारत उजव्या हाताची बोटे तात्यांच्या दिशेने नाचवित गण्या कुडाळकर तावातावाने भांडत होता.

‘‘तसोही मेल्या तू बापाशीचा कधी ऐकतंस?’’ गण्याच्या मागे उभे असलेले अण्णा वेंगुर्लेकर तोंडातल्या तोंडात पुटपुटले. ते ऐकून गण्या खवळला. शिव्या घालण्यासाठी मागे वळला तर समोर अण्णा! अण्णा हे त्याच्या वडिलांचे मित्र! तोंडातल्या शिव्या कशाबशा गिळून गण्या गप्प बसला.

‘‘अण्णानूं उगीच बसलो गांधील उठवू नको हा तुम्ही!’’ गण्याची ती अवस्था पाहून तात्यांनी अण्णांना खोटाखोटाच दम भरत डोळा मारला. ‘‘अरे पन नेमका काय झाला हा ता तरी कळांदे आमका!’’ इतका वेळ शांत बसलेल्या बाब्या नाईकांनी आता संभाषणात उडी घेतली.

‘‘खऱ्याचो जमानोच रवलोलो नाय! नाईकांनू गेलो अर्धा तास मी माजे सगळ्यो शिरा ताणून सांगतंय यंदाच्या या वर्ल्ड कपमध्ये दम नाय.’’ गण्याला पुढे बरेच काही बोलायचे होते, पण क्रिकेटला जीव की प्राण मानणाऱ्या नाईकांनी त्याला पुढे बोलूच दिले नाही. ‘‘गण्या मेल्या तू खुळो असंस काय? अरे जगातले धा संघ तडे एका कपासाठी एकमेकांच्या उरावर बसतंत त्यांचा कौतुक करायचा सोडून.’’

‘‘नाईकांनू खराच मजा नाय वो. सुरवातीचे मॅची पाहिलास ना? कसे एकतर्फी. देवाला कौल लावल्यासारखे होतहत ते. त्यापेक्षा मराठी बिग बॉस बघा, त्यात जास्त अ‍ॅक्शन असा! नायतर.’’

‘‘तू गपच रव. बकासुरा! जत्रेतल्या दशावतारापेक्षा तुजो डोळो भजी आणि उसळीवर असता ह्य काय आमका माहीत नाय?’’ त्याला थांबवत अण्णांनी सिक्सर ठोकला. ‘‘त्याचो हयसर काय संबंध? माका एखादी गोष्ट पटना नाय तर नाय!’’ गण्याच्या स्वरातून निर्धार असा काही ठिबकत होता की गाबतिणीच्या टोपलीतून गळणारे म्हावऱ्याचे पाणी!

गण्या काहीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नाही, हे पाहून तात्यांनी हुकमी डाव टाकला. बाजूच्या चहाच्या टपरीकडे पाहत त्यांनी ‘‘रम्या, चार कटिंग आण रे!’’ असा पुकारा केला. ‘‘खडखडे लाडू दी रे चार-पाच!’’ नाईकांनी ऑर्डरला आपली शेपटी जोडली. चहा आणि लाडू मिळणार म्हटल्यावर गण्या जरा शांत झाला. पण त्याची जीभ चुरुचुरु बोलतच होती. ‘‘यावेळच्या इलेक्शनात पण कायवं गंमत नाय होती. एकाच पक्षानं सगळो धुरळो उडवल्यानं! झुंज होव्हक व्हयी अटीतटीची!! मगे मजा येता.  वर्ल्ड कप फुस्स असा.’’

चहापानाचा भावी कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडायचा असेल तर गण्याला आवरायला हवा, हे लक्षात आल्यामुळे तात्या सरपंचांनी गजालीची सूत्रे आपल्या हातात घेतली. ‘‘गण्या अवघ्या पंचक्रोशीस तुजो अभिमान असा. तुजा बोलणा म्हंजे काळ्या दगडावरील रेघ! आपल्या या कोकणाची शानच असंय तू!’’ सर्वानीच याला ‘‘व्हयं.. व्हयं..’’ असं म्हणत दुजोरा दिला. यावर काय बोलावं हे गण्याला सुचेना!

‘‘अरे, आतासो वर्ल्ड कप सुरू झालो हा. नुकत्याच जन्मलेल्या पोराक कामावर धाडता काय कोण? नाय नां? तसाच हा ह्य. अरे तिथला वातावरण, पिची सगळाच नवा असा. आता बघ पुढचे मॅची कसे रंगत जातले ते.’’ तात्यांनी आपला अनुभव शब्दात मांडला. ‘‘कोणतोही संघ कप उचलू शकता. अरे, हीच तर मजा असा या स्पर्धेची!’’ अण्णांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला.

‘‘तसा ह्य पटला माका पण..’’ गण्याचे शब्द अर्धवटच राहिले. कारण वाफाळलेला चहा आणि खडखडे लाडू घेऊन रम्या समोर उभा होता. सगळ्यांनी पृथ्वीवरील अमृताची चव चाखली आणि मग वाद संपून सुसंवादाला सुरुवात झाली. विषय होता. ‘‘ वर्ल्ड कप कोण जिंकतलो?.. भारतच!’’