भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत दोन वेळा क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. १९८३ साली कपिल देवच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदा विश्वचषक उंचावला. त्यानंतर तब्बल २८ वर्षांनी म्हणजेच २०११ साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक स्पर्धा जिंकली. २ एप्रिल २०११ रोजी भारत आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ६ बाद २७४ धावा फटकावल्या होत्या. तर भारताने ४८.२ षटकांत ४ गड्यांच्या बदल्यात हे लक्ष्य साध्य करून विश्वविजेतेपद मिळवलं होतं.
दरम्यान, या सामन्यात एक मजेशीर गोष्ट घडली होती. या सामन्यात दोन वेळा नाणेफेक (टॉस) झाली होती. अलिकडेच याबद्दल श्रीलंकेचा तत्कालीन कर्णधार कुमार संगकाराने खुलासा केला आहे. भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनशी लाईव्ह चॅट करताना संगकाराने याबद्दल माहिती दिली.
संगकारा म्हणाला, त्या सामन्यासाठी वानखेडे स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं. श्रीलंकेत इतकी गर्दी होत नाही. असं केवळ भारतातच होतं. भारतात इतकी गर्दी असते की, खेळाडूंना एकमेकांचं बोलणं ऐकू येत नाही. एकदा कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर असं झालं होतं. मी यष्टीरक्षण करत असताना स्लिपमध्ये उभ्या असलेल्या आमच्या खेळाडूचं बोलणं मला काहीच ऐकू येत नव्हतं. वानखेडेतही तशीच परिस्थिती होती. सामन्याआधी सामनाधिकाऱ्यांनी नाणं उडवलं, परंतु, मी काय बोललं ते माहीला (एमएस धोनी) कळलंच नाही.
त्यानंतर धोनीने मला विचारलं, तू टेल्स बोललास का? मी त्याला म्हटलं नाही, मी हेड्स बोललो, मग मॅच रेफरींनी मला सांगितलं की मी नाणेफेक जिंकलोय. मग माही म्हणाला नाही, मला काही कळलंच नाही. तिथे थोडा गोंधळ झाला. मग माही म्हणाला आपण पुन्हा नाणेफेक करुया. त्यानंतर पुन्हा एकदा नाणं उडवलं.
हे ही वाचा >> नवव्या वर्षी उचलली बंदूक, १३ व्या वर्षी नॅशनल चॅम्पियन, Asiam Games मध्ये ४ पदकं जिंकून वडिलांच्या कष्टाचं चीज केलं
दरम्यान, दुसऱ्यांदा झालेली नाणेफेक कुमार संगकाराने जिंकली आणि त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महेला जयवर्धनेच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने निर्धारित ५० षटकांत ६ बाद २७४ धावांचा डोंगर उभा केला. श्रीलंकेचं हे आव्हान भारताने ४८.२ षटकांत ४ गड्यांच्या बदल्यात पूर्ण केलं.