Why Aamir Jamal Fined by PCB : पाकिस्तानी क्रिकेटर गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. यादरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज अमीर जमाल हा एका नव्या वादात सापडला आहे. त्याने पाकिस्तानच्या कसोटी क्रिकेटच्या कॅपवर ‘८०४’ हा क्रमांक लिहिल्याने त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी जमाल याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) १.४ मिलीयन पाकिस्तानी रुपये इतका दंड ठोठावला आहे.

टोपीवर ८०४ क्रमांक लिहिणे ही कृती सध्या तुरूंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाठिंबा देत करण्यात आलेले राजकीय विधान म्हणून पाहण्यात आले. समा टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, आचारसंहितेचे उलंघन केल्या प्रकरणी अनेक खेळाडूंना पीसीबीने दंड ठोठवला आहे, पण जमाल याला सर्वाधिक कठोर शिक्षा देण्यात आली आहे.

नेमकं कारण काय?

‘८०४’ हा क्रमांक माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरूंगातील बॅज क्रमांक असल्याचे मानले जाते. त्यामुळे इम्रान खान यांना पाठिंबा दर्शवन्यासाठी हा क्रमाक वापरला जातो. दरम्यान हा क्रमांक खेळाडूने उघडपणे प्रदर्शित केल्याने पीसीबीने त्याच्यावर कारवाई केली आहे. खेळाडूंनी त्यांच्या राजकीय विचार मैदानावर प्रदर्शित करण्याबाबत पीसीबीने कठोर भूमिका घेतली आहे. यामुळे जमाल याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या पाकिस्तानी संघातून देखील वगळण्यात आले.

ही पहिलीच वेळ नाही

जमाल याच्याबरोबरच यापूर्वीही इतर पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उशिरा परतल्याबद्दल सैम अयुब, सलमान अली आघा आणि अब्दुल्ला शफीक यांच्यासह अनेक पाकिस्तानी खेळाडूंना प्रत्येकी ५००००० पाकिस्तानी रुपये दंड ठोठावण्यात आला होता. तसेच पाकिस्तानच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी अशाच नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सुफियान मुकीम, अब्बास आफ्रिदी आणि उस्मान खान यांना प्रत्येकी २०० डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघात शिस्त राखण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. याबरोबरच क्रिकेटला राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Story img Loader