Why the delay in the announcement Team India coach : भारतीय संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरकडे बऱ्याच काळापासून पाहिले जात आहे. आता राहुल द्रविडचा कार्यकाळही संपला आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय लवकरच नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा करू शकते. सध्या व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहे. आता अहवालात असे समोर आले आहे की गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सबरोबर फेअरवेल व्हिडीओ शूट करताना दिसला. जर गोष्टी इतक्या स्पष्ट आहेत, तर बीसीसीआयला त्याच्या नावाची घोषणा करण्यास इतका वेळ का लागत आहे? जाणून घेऊया.
गौतम गंभीरच्या नावाची घोषणा होण्यास विलंब का?
गौतम गंभीरच्या नावाची घोषणा होण्यास विलंब होण्याचे कारण मानधनातील वाटाघाटी आहे. इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, गंभीर आणि बीसीसीआयमधील मानधनाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. गंभीरच्या मानधनावर अंतिम निर्णय होताच बीसीसीआय त्याची घोषणा करेल. भारतीय क्रिकेट संघाच्या (पुरुष) मुख्य प्रशिक्षकाच्या वेतनाबाबत बीसीसीआयने पर्याय खुले ठेवले आहेत. यासाठी अर्जदारांना आमंत्रित करणाऱ्या जाहिरातीमध्ये असे नमूद करण्यात आले होते की, मोबदला हा वाटाघाटीयोग्य आहे आणि अनुभवाशी सुसंगत असेल.
गंभीरला द्रविडपेक्षा जास्त पगार मिळण्याची अपेक्षा –
गंभीरला मागील प्रशिक्षक राहुल द्रविडपेक्षा जास्त पगार मिळण्याची अपेक्षा आहे, ज्याचे वार्षिक वेतन सुमारे १२ कोटी रुपये होते. राष्ट्रीय स्तरावर गंभीरचा हा पहिलाच कार्यभार असेल. रेकॉर्डनुसार, तो कधीही कोणत्याही संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून जोडला गेला नाही. त्याचा एकमेव कोचिंगचा अनुभव आयपीएलमधला आहे, जिथे तो गेल्या वर्षी केकेआर संघाबरोबर जोडला जाण्यापूर्वी काही हंगामांसाठी लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक होता. त्यानंतर केकेआरला यंदा जेतेपद मिळवून त्याचे योगदान होते.
हेही वाचा – हार्दिक पंड्याच्या इन्स्टा पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष, सेटबॅकपासून ते कमबॅकपर्यंतचा VIDEO केला शेअर
गंभीरला त्याच्या सपोर्ट स्टाफची निवड करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य –
सध्या भारतीय संघ एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली झिम्बाब्वेमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. याआधी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पुष्टी केली होती की, भारत नवीन मुख्य प्रशिक्षकासह मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंकेला जाणार आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, बीसीसीआय लवकरच संघाच्या सपोर्ट स्टाफसाठी अर्ज मागवेल. कारण टी-२० विश्वचषकानंतर फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांचा कार्यकाळ संपला आहे. बीसीसीआय सपोर्ट स्टाफची नियुक्ती करताना मुख्य प्रशिक्षकाला अंतिम निर्णय घेण्याची मुभा देते. ज्यामुळे अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, गंभीरला त्याच्या सपोर्ट स्टाफची निवड करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाईल.
हेही वाचा – उमा छेत्रीने केली मोठी चूक, भारताला बसला ४७ धावांचा फटका; नेमकं काय झालं? पाहा VIDEO
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनण्यासाठी दावेदाराला इतर सर्व पदांचा राजीनामा द्यावा लागतो. याचा अर्थ, टीम इंडियाचे प्रशिक्षक असताना, तुम्ही इतर संघाचे कोच होऊ शकत नाही किंवा इतर कोणत्याही संघाशी किंवा फ्रेंचायझीशी संबंधित राहू शकत नाही. २०२४ च्या आयपीएलमध्ये गौतम गंभीर केकेआरचा मार्गदर्शक बनला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली संघाने ट्रॉफीही जिंकली होती. आता रेव्ह स्पोर्ट्सच्या सोशल मीडियावर गंभीरचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून तो गेल्या शुक्रवारी कोलकाता येथे शूट केला होता. ज्यावरुन त्याने ईडन गार्डन येथे फ्रँचायझीसाठी निरोपाचा व्हिडिओ शूट केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.