Aakash Chopra on Ravindra Jadeja: भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा नुकत्याच पार पडलेल्या आशिया कप २०२३ मध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीत फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. खेळाच्या कोणत्याही स्वरूपातील जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक, जडेजाची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात निवड झाली आहे. स्पर्धेच्या आधी, भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने अष्टपैलू खेळाडू जडेजाच्या फलंदाजीतील कामगिरीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्याने म्हटले आहे की, “गेल्या चार वर्षांत जडेजाचा स्ट्राइक-रेट वन डे फॉरमॅटमध्ये कमी झाला आहे.”
भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने त्याच्या आकडेवारीकडे लक्ष वेधले आणि सांगितले की, “जडेजाचा एकदिवसीय कारकिर्दीतील ८४.२ स्ट्राइक-रेट तो आता कमी झाला आहे. २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकापासून त्याचा स्ट्राइक-रेट हा ७९.४ झाला आहे. आधीच्या फलंदाजीतील स्ट्राइक-रेटपेक्षा हा खूपच कमी आहे.” माजी खेळाडू पुढे म्हणाला की, “२०१९ पासून, जडेजाची फलंदाजीची सरासरी त्याच्या कारकिर्दीच्या सरासरीपेक्षा (३१.९) खूपच चांगली आहे (३९.४). वन डे मध्ये स्ट्राईक रेट कमी झाला आहे.”
भारताचा कर्णधार रोहित शर्माने खालच्या फळीतील खेळाडूंनी फलंदाजीत चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केलं आहे. रोहितने पत्रकार परिषदेत सांगितले की, “क्रिकेट खेळण्याची ही आधुनिक पद्धत आहे आणि भारताला त्यांच्या खालच्या फळीने फलंदाजीत योगदान द्यावे असे वाटते. भारताने एकदिवसीय फॉरमॅटमध्ये दोन फिरकी गोलंदाजी अष्टपैलूंचा समावेश केला आहे, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा. अक्षरची गोलंदाजीतील कामगिरी खराब झाली आहे, तर जडेजाची फलंदाजीत खराब कामगिरी करत आहे.”
एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे आणि त्यांनी वॉशिंग्टन सुंदर आणि रविचंद्रन अश्विन यांना स्पर्धेपूर्वी चाचणीसाठी बोलावले आहे. दुखापतीमुळे आशिया कप फायनलमध्ये खेळू न शकलेल्या अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारताचा विश्वचषकातील पहिला सामना हा ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच चेन्नई येथे होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ (पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी)
लोकेश राहुल (कर्णधार/विकेटकीपर) शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, तिलक वर्मा, प्रसिध्द कृष्णा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.
तिसऱ्या सामन्यासाठी
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, कुलदीप यादव., अक्षर पटेल (फिटनेसबद्दल शंका), रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.