Babar Azam Special GPS Tracker Vest: पाकिस्तान क्रिकेट संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेचा २-० असा पराभव केला. श्रीलंकेला त्यांच्यात देशात व्हाईट वॉश देत पाकिस्तानने नवा विक्रम केला. मात्र, त्या दरम्यान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो श्रीलंकेतील एका छोट्या चाहत्याला त्याची जर्सी भेट देत आहे. त्याने जर्सी काढल्यावर आतमध्ये ‘स्पोर्ट्स ब्रा’ घातलेल्या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स येत आहेत. यामध्ये बाबर आझमने परिधान केलेल्या स्पोर्ट्स ब्रा जीपीएस ड्रेसमुळे तो (जीपीएस परफॉर्मन्स ट्रॅकर) ट्रोल होत आहे. चाहते हे काहीतरी वेगळं (स्पोर्ट्स ब्रा) समजत आहेत, पण ते काय आहे? ते आम्ही तुम्हाला सांगतो.
बाबर आझमला पाहण्यासाठी आलेले अनेक चाहते व्हिडीओमध्ये दिसत आहेत. त्यात काही मुलेही आहेत. बाबर आझम लगेच त्याची पाकिस्तान कसोटी संघाची जर्सी काढून त्या मुलांना देतो आणि तिथून निघून जातो. बाबरची जर्सी मिळाल्याने मुलांना खूप आनंद झाला होता. पण बाबर जेव्हा त्याची जर्सी काढत असतो तेव्हा त्याने आत काहीतरी घातलेले असते. जी स्पोर्ट्स ब्रासारखी दिसते. यासाठी चाहते त्याला ट्रोलही करत आहेत. बाबर आझमने हे का घातले आहे, असा सवाल चाहते करत आहेत. त्यामुळे बाबरने काय परिधान केले आहे हे अनेक चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.
बाबर आझमने परिधान केलेला जीपीएस परफॉर्मन्स ट्रॅकर काय आहे?
सर्वप्रथम, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की जीपीएस ट्रॅकर ही स्पोर्ट्स ब्रा नाही. आजकाल सराव किंवा प्रशिक्षण करताना अनेक क्रिकेटपटू जीपीएस परफॉर्मन्स ट्रॅकर वापरतात. केवळ क्रिकेटपटूच नाही तर फुटबॉलपटू आणि इतर खेळांचे मोठे खेळाडूही याचा वापर करतात. यामुळे खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा होण्यास मदत होते. जीपीएस ट्रॅकर प्रति सेकंद १२५० डेटा काढू शकतो. अॅथलीट्सचा भार आणि प्रयत्न मोजण्यासाठी हे उपकरण प्रति सेकंद १२५० पेक्षा जास्त डेटा रेकॉर्ड करू शकते. हे अॅथलीट्स आणि प्रशिक्षकांना एकूण अंतर, टॉप स्पीड, स्प्रिंटची संख्या, स्प्रिंट अंतर, पॉवर, लोड, तीव्रता आणि बरेच काही ट्रॅक करून देते. यामुळे खेळाडूंच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यास मदत होते.
यातून मिळालेल्या माहितीचा एक सेंट्रल डेटाबेस तयार केला जातो, जो कोच किंवा स्पोर्ट्स स्पेशलिस्ट पाहतो. यानंतर आठवडे, महिन्यांचा डेटा घेऊन, खेळाडूच्या प्रक्रियेचे मूल्यांकन केले जाते. टीम इंडियाचे खेळाडूही त्याचा वापर करतात. २०१८ मध्ये, भारताचे सामर्थ्य आणि कंडिशनिंग प्रशिक्षक शंकर बसू यांनी ते टीम इंडियामध्ये आणले.
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, शंकर बसू यांनी २०१९ मध्ये याबद्दल सांगितले होते की, या जीपीएस डिव्हाइसचा वापर करून त्यांना खेळाडूबद्दल योग्य माहिती मिळते. त्यांनी सांगितले की, जर एखादा खेळाडू एका सामन्यात २००० मीटर धावत असेल तर ही चिंतेची बाब आहे. यामुळे आपल्याला त्याचा फिटनेस योग्य ठेवण्यासाठी मदत होऊ शकते आणि दुसऱ्या दिवशी त्या खेळाडूला विश्रांती घेण्यास सांगता येईल.