Fans Reaction After Selectors Ignore Rinku Singh: भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर ३ ऑगस्टपासून दोन्ही संघांमध्ये टी२० सामने होणार आहेत. ५ सामन्यांच्या या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली १५ खेळाडूंचा संघ निवडण्यात आला आहे. यामध्ये निवड समितीने अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. या संघ निवडीबाबत आम्ही तुम्हाला ५ महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.
रिंकू सिंगकडे निवड समितीने दुर्लक्ष केले
आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंगला या संघात स्थान मिळालेले नाही. तो भारतीय संघाचा भावी फिनिशर मानला जातो. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याचा रेकॉर्डही मजबूत आहे. यानंतरही संघात स्थान मिळाले नाही. यामध्ये रिंकू सिंगलाही स्थान मिळेल, अशी आशा चाहत्यांना होती, मात्र त्याला संघात स्थान न मिळाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.
कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा झाल्यानंतर टी२० संघात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा सातत्याने होत होती. यामध्ये रिंकू सिंगचे नाव आघाडीवर होते. आयपीएलच्या १६व्या हंगामातील रिंकूची कामगिरी पाहिल्यानंतर अनेक माजी खेळाडूंनीही त्याला टीम इंडियासोबत खेळण्याचा हक्कदार म्हटले. अशा परिस्थितीत निवड समितीने दुर्लक्ष करण्याच्या निर्णयामुळे चाहत्यांचा संताप सोशल मीडियावर स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
दीपक हुड्डा याच्यासह अनेक जणांना वगळले
भारताने जानेवारी-फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटची टी२० मालिका खेळली होती. त्या संघात समाविष्ट असलेल्या दीपक हुड्डाला डच्चू देण्यात आला आहे. आयपीएल २०२३मध्ये हुड्डा लखनऊकडून खेळताना पूर्णपणे अपयशी ठरला होता. पृथ्वी शॉ देखील या संघाचा भाग नाही.
दोन नवीन डाव्या हाताचे फलंदाज
टीम इंडियाच्या टॉप ऑर्डर किंवा मिडल ऑर्डरमध्ये डाव्या हाताच्या फलंदाजाची कमतरता होती. या संघात इशान किशनसोबत यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा आहेत. दोघेही डाव्या हाताचे फलंदाज आहेत. यासोबतच दोघेही अर्धवेळ गोलंदाजी करू शकतात.
बिष्णोई आणि आवेश संघात परतले
रवी बिश्नोई आणि आवेश खान यांना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. बिश्नोई आणि आवेश या दोघांनी गेल्या वर्षी आशिया कपमध्ये भारतासाठी शेवटचा टी२० सामना खेळला होता. या दौऱ्यासाठी दोन्ही खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.
विराट-रोहितला पुन्हा संघातून वगळले
रोहित शर्मा आणि विराट कोहली टी२० विश्वचषकापासून या फॉरमॅटमध्ये भारताकडून खेळलेले नाहीत. हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करत आहे. त्याला अद्याप अधिकृतपणे कर्णधारपद मिळालेले नाही. यावेळीही बीसीसीआयकडून रोहित किंवा विराटबद्दल काहीही बोलले गेले नाही.