India vs England ICC Cricket World Cup 2023 Match Updates: या विश्वचषकात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची कामगिरी काही विशेष झाली नाही आणि त्याचा संघही विश्वचषकातून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. बाबरच्या कर्णधारपदाबरोबरच त्याच्या फलंदाजीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. पॉवरप्लेमध्ये त्याला वेगाने धावा करता येत नाहीत. भरपूर टीका होत असताना बाबरने विश्वचषकादरम्यान सांगितले की, त्याला रोहित शर्मा आणि विराट कोहली का आवडतात.
बाबर आझमने भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सवर विराट आणि रोहितबद्दल चर्चा केली. बाबर म्हणाला, “विराट कोहली, रोहित शर्मा आणि केन विल्यमसन हे माझे आवडते फलंदाज आहेत. हे तिघे जगातील अव्वल खेळाडू आहेत. यामागील कारण म्हणजे हे तिघे संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढतात आणि विजय मिळवून देतात, म्हणूनच मला ते आवडतात.”
पाकिस्तानच्या कर्णधाराने पुढे सांगितले की त्याला रोहित आणि विराट इतके का आवडतात. बाबर म्हणाला, “विराट, रोहित आणि केन विल्यमसनची एक गोष्ट मला सर्वात जास्त आवडते ती म्हणजे ते संघाचा डाव सावरत मोठी धावसंख्या कशी उभारता येईल किंवा धावसंख्येचा पाठलाग कसा करायचा, हे यातून शिकता येईल. चांगल्या गोलंदाजांविरुद्धही सहज धावा करतात, हेच या तिघांकडून मी शिकण्याचा प्रयत्न करतो.”
विश्वचषकात पाकिस्तानची खराब कामगिरी
२०२३च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानची आतापर्यंतची कामगिरी खूपच खराब झाली आहे. बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने या स्पर्धेत आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये संघाने दोन जिंकले असून चार पराभव पत्करले आहेत. त्याचबरोबर आगामी सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या चाहत्यांना संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या २६व्या सामन्यात पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेतील हा आतापर्यंतचा सर्वात रोमांचक सामना होता आणि शेवटी दक्षिण आफ्रिकेने एका विकेटने विजय मिळवला. सलग चौथ्या सामन्यातील पराभवामुळे पाकिस्तान संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. यासोबतच दक्षिण आफ्रिकेचा संघ पाचव्या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आला आहे.
दक्षिण आफ्रिकेला २५० धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर मार्करामही बाद झाला. यानंतर पाकिस्तान हा सामना जिंकू शकेल असे वाटत होते. लुंगी एनगिडी चार धावा करून बाद झाला तेव्हा दक्षिण आफ्रिका विजयापासून ११ धावा दूर होती. अशा स्थितीत तबरेझ शम्सी आणि केशव महाराज यांनी विकेट न गमावता दक्षिण आफ्रिकेला एका विकेटने विजय मिळवून दिला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने तीन विकेट्स घेतल्या. हारिस रौफ, मोहम्मद वसीम आणि उसामा मीर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.