Why Host Pakistan Officials not on Champions Trophy Final Ceremony stage: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानकडे होते. पण चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलच्या सादरीकरण सोहळ्यात यजमान पाकिस्तानचा एकही अधिकारी स्टेजवर उपस्थित नव्हता. सादरीकरण सोहळ्याकरता स्टेजवर भारतीय अधिकाऱ्यांचं वर्चस्व दिसून आलं. त्यामुळे आता वाद होणं साहजिकच होतं. शोएब अख्तरच्या वक्तव्याने या वादात आणखीच भर पडली आहे. पाकिस्तानचा कोणीच अधिकारी तिथे उपस्थित नाही असं का झालं हे समजण्यापलीकडचे आहे, असे वक्तव्य त्याने केलं. मात्र, यामागे पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने ठोस कारण पाहिले.

शोएब अख्तरने फायनलच्या सादरीकरण सोहळ्याला पीसीबी चेअरमन किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित केला होता. हे समजण्यापलीकडचे असल्याचे त्याने म्हटले होते. जागतिक स्तरावरील स्पर्धेत असं होणं ही चिंतेची बाब आहे. पाकिस्तानचे अधिकारी स्टेजवर असायला हवे होते. पण आम्हाला ते बघायला मिळालं नाही.

पण पाकिस्तानचे कोणतेच अधिकारी किंवा पीसीबीचे चेयरमन दुबईत अंतिम सोहळ्यासाठी का उपस्थित नव्हते हे वसीम अक्रमने युट्युब चॅनलवरील व्हीडिओमध्ये सांगितले. वसीम अक्रमच्या म्हणण्यानुसार, पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी दुबईला फायनलसाठी न पोहोचण्याचे खरे कारण म्हणजे त्यांची प्रकृती. स्पोर्ट्स सेंट्रल नावाच्या यूट्यूब चॅनलवर याबाबत माहिती देताना तो म्हणाला की, माझ्या माहितीनुसार पीसीबी अध्यक्षांची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे ते फायनलला जाऊ शकले नाहीत. वसीम अक्रम पुढे म्हणाला की, पीसीबीचे दोन अधिकारी सुमेर अहमद आणि उस्मान वाला निश्चितपणे तिथे पोहोचले होते, परंतु ते मंचावर का गेले नाहीत याबद्दल काही कल्पना नाही.

भारतीय संघाचे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील सर्व सामने दुबईत खेळवले गेले, त्यामुळे संघाचा अंतिम सामनाही दुबईतच खेळवण्यात आला. न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव करत भारताने विजेतेपदावर नाव कोरले. टीम इंडियाने जिंकलेले हे तिसरे चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद आहे. यापूर्वी संघाने २००२ आणि २०१३ मध्ये हे विजेतेपद पटकावले होते. चॅम्पियन बनल्यानंतर भारताने आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी रोहित शर्माला ट्रॉफी सादर केली आणि सर्व खेळाडूंनी एकच जल्लोष करत आनंद साजरा केला.

Story img Loader