IND vs ENG 3rd ODI Updates in Marathi: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात दोन्ही संघांचे खेळाडू हिरवे आर्म बँड घालून मैदानात उतरले. सामन्याच्या नाणेफेकीच्या वेळी रोहित आणि बटलर क्रीझवर आले तेव्हा त्यांच्या हातावर हिरव्या रंगाच्या पट्ट्या होत्या. दोन्ही संघांचे खेळाडू हिरवे आर्म बँड घालून मैदानात उतरले आहेत आणि या मागचे कारणही खास आहे.
सहसा, एखाद्या क्रीडाविश्वातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर खेळाडू त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काळ्या रंगाची पट्टी हातावर बांधून मैदानावर येतात. मात्र यावेळी या पट्टीचा रंगही वेगळा आहे आणि कारणही वेगळे आहे. बीसीसीआयने विशेष मोहीम सुरू केली असून त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
इंग्लंड क्रिकेटने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एका पोस्टद्वारे याचे कारण स्पष्ट केले. तर इंग्लंड संघाने केलेली पोस्ट बीसीसीआयने रिशेअर केली आहे. तर बीसीसीआयने नाणेफेकीच्या वेळेचे फोटो शेअर करत या हिरव्या पट्टी दंडावर बांधण्याचे कारण सांगितले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ‘दोन्ही संघांनी बीसीसीआयच्या “अवयव दान करा, जीव वाचवा” या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी हिरव्या रंगाचे आर्म बँड घातले आहेत. या उपक्रमाचे नेतृत्व आयसीसीचे अध्यक्ष श्री जय शाह करत आहेत. प्रतिज्ञा घ्या, संदेश पसरवा आणि अर्थपूर्ण उपक्रमाचा भाग होऊ या.’
बीसीसीआयने तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी पोस्ट करत अखेरच्या वनडे सामन्यात हा उपक्रम राबवणार असल्याची माहिती दिली होती. यासाठी भारतीय संघ अवयव दान करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन देत असल्याचे व्हीडिओदेखील बीसीसीआयने शेअर केले होते.
तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारताचा कर्णधार रोहित शर्माने आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती, असे सांगितले. भारताने या वनडे मालिकेत दोन्ही वेळेस लक्ष्याचा पाठलाग करत विजय मिळवला होता. पण या सामन्यात भारत प्रथम फलंदाजी करताना कशी कामगिरी करतो, हेही पाहायचं आहे. भारताला दुसऱ्याच षटकात कर्णधार रोहित शर्माच्या रूपात धक्का बसला, पण विराट कोहली आणि शुबमन गिलने भारताचा डाव सावरला आहे.
Today, we’re wearing green ribbons alongside India to support the 'Donate Organs, Save Lives' initiative ❤️
— England Cricket (@englandcricket) February 12, 2025
? @BCCI pic.twitter.com/3yc8BTgOQC