रांचीच्या मैदानामध्ये झालेला भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यानचा दुसरा टी-२० सामना भारताने सात गडी आणि १६ चेंडू राखून जिंकला. मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेलने (२/२५) पदार्पणाच्या लढतीत न्यूझीलंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला़ त्यानंतर सलामीवीर के. एल. राहुल (४९ चेंडूंत ६५ धावा) आणि कर्णधार रोहित शर्मा (३६ चेंडूंत ५५ धावा) यांनी शतकी भागीदारी रचल्यामुळे भारताचा विजय सोपा झाला. मात्र मालिकेतील पहिल्या सामन्याप्रमाणेच विजयाच्या जवळ आल्यानंतर भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाजांनी विकेट्स फेकल्या. पण ऋषभ पंतने १८ व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर षटकार लगावत सामना जिंकून दिला. पंत या दोन षटकारांबरोबरच एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत होता. ते कारण म्हणजे तो फिल्डींग करताना जर्सीवर चिकटपट्टी लावून मैदानात उतरलेला. पण त्याने असं का केलेलं याचं कारण आता सामोर आलं आहे.

पंत भारतीय यष्टीरक्षक म्हणून शुक्रवारी मैदानामध्ये उतरला तेव्हा त्याच्या जर्सीवर उजव्या बाजूला छातीजवळ चिकटपट्टी लावण्यात आल्याचं दिसून आलं. अनेकदा क्षेत्ररक्षण करताना जेव्हा जेव्हा पंत कॅमेरात कैद झाला तेव्हा या चिकटपट्टीचं दर्शन झालं. पण त्याने तिथे चिकटपट्टी का लावलेली असा प्रश्न अनेकांना पडलाय. तर या मागील कारण आहे आयसीसीचा एक नियम.

पंतने न्यूझीलंडविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेमधील सामन्यात घातलेली जर्सी ही नुकत्याच युएईमध्ये पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमधील होती. या जर्सीवर टी-२० विश्वचषक २०२१ असा लोगो होता. त्यामुळेच हा लोगो आणि मजकूर झाकण्यासाठी पंतला चिकटपट्टीची मदत घ्यावी लागली. कोणत्याही द्विपक्षीय मालिकेदरम्यान आयसीसीचा लोगो असणारी जर्सी खेळाडूंनी परिधान करु नये असा आयसीसीचा नियम आहे. पंत वगळता इतर सर्व भारतीय खेळाडू या मालिकेसाठीची जर्सी घालून मैदानात उतरलेले ज्यावर बायजूजची जाहिरात होती.

यंदाच्या टी-२० विश्वचषकामधून भारतीय संघ उपांत्यफेरीआधी म्हणजेच साखळी फेरीतच स्पर्धेबाहेर फेकला गेला. सुपर १२ फेरीमध्ये भारताने पाचपैकी तीन सामने जिंकले होते.

Story img Loader