BCCI Central Contract Rohit Sharma, Virat Kohli & Ravindra Jadeja in A+ List : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ या क्रिकेट हंगामासाठी टीम इंडियाशी करारबद्ध (सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट) खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयने वार्षिक करार केलेल्या एकूण ३४ खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. या खेळाडूंची अ+, अ, ब आणि क अशा चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या श्रेणीनुसार खेळाडूंना बीसीसीआयकडून वार्षिक मानधन दिलं जातं. बीसीसीआयने यावेळी ५ नव्या खेळाडूंना करारबद्ध केलं आहे, तर आधीच्या यादीमधील नऊ खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे.

बीसीसीआयने करारबद्ध केलेल्या अ+ श्रेणीतील खेळाडूंना दरवर्षी ७ कोटी रुपये दिले जातात. अ श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी रुपये, ब श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी रुपये आणि क श्रेणीतील खेळाडूंना १ कोटी रुपये वार्षिक मानधन दिलं जातं. अ प्लस श्रेणीत विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या वरिष्ठ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. रवीचंद्रन अश्विन पूर्वी या श्रेणीत होता. मात्र तो निवृत्त झाल्यामुळे त्याचा करार यादीत समावेश करण्यात आलेला नाही.

टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर विराट, रोहित व जडेजाची टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती

जे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये (कसोटी, एकदिवसीय व टी-२०) भारतीय संघाचं सातत्याने प्रतिनिधित्व करतात त्याच खेळाडूंचा अ+ श्रेणीत समावेश केला जातो. मात्र, गेल्या वर्षी भारताने टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तरीदेखील या तिन्ही खेळाडूंना बीसीसीआयने अ+ श्रेणीत का स्थान दिलंय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

निवृत्तीनंतरही या खेळाडूंना A+ श्रेणीत स्थान का दिलं?

रोहित, विराट व जडेजा हे तिन्ही खेळाडू ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ पर्यंत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारताकडून खेळत होते. त्याच आधारावर १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ या हंगामासाठी बीसीसीआयने खेळाडूंबरोबर वार्षिक करार केला आहे. त्यामुळे हे तिन्ही खेळाडू अ+ श्रेणीत आहेत. सप्टेंबर २०२५ मध्ये हा करार संपेल. त्यानंतर बीसीसीआय ऑक्टोबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२६ पर्यंतच्या क्रिकेट हंगामासाठी वार्षिक करार केलेल्या खेळाडूंची नवी यादी जाहीर करेल. हे तिन्ही खेळाडू एकदिवसीय व कसोटी क्रिकेट खेळत राहिले तर या तिघांचा त्यावेळी अ श्रेणीत समावेश केला जाईल आणि त्यांना बीसीसीआयकडून वार्षिक ५ कोटी रुपये मानधन मिळेल.