Rohit Sharma To Visit Pakistan Ahead Of ICC Champions Trophy 2025: भारतीय क्रिकेट संघाच्या नजरा आता चॅम्पियन्स ट्रॉफीवर आहेत. भारतीय संघ १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सहभागी होणार आहे. १९९६ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर पहिल्यांदाच पाकिस्तान आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही. ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलप्रमाणे आयोजित केली जाईल, जिथे भारत त्यांचे सामने दुबईत खेळेल, तर उर्वरित स्पर्धा पाकिस्तानमध्ये होतील. पण हल्ली रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जावं लागेल अशी चर्चा आहे. यामागे काय कारण आहे जाणून घेऊया.
रोहित शर्माला पाकिस्तानला का जावं लागणार?
कोणत्याही ICC स्पर्धेपूर्वी, एक अधिकृत कार्यक्रम असतो ज्यामध्ये ट्रॉफीसह सहभागी संघांच्या सर्व कर्णधारांचे फोटोशूट केले जाते. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व ८ कर्णधारांचे फोटोशूट केले जाते. हे फोटोशूट पाकिस्तानमध्ये होण्याची शक्यता आहे. फोटोशूट कुठे होणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु जर ते पाकिस्तानमध्ये झाले तर रोहित शर्माला भारतीय कर्णधार म्हणून पाकिस्तानचा दौरा करावा लागू शकतो.
वृत्तसंस्था IANS च्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उद्घाटन समारंभासाठी एका भव्य कार्यक्रमाचे नियोजन करत आहे. हा कार्यक्रम १६ किंवा १७ फेब्रुवारीला करण्याचा विचार करत आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आठही संघांचे कर्णधार या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. इतर कर्णधारांसह रोहित शर्माही उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पाकिस्तानला जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
भारतीय संघाने २००८ च्या आशिया कपमधील श्रीलंकेविरूद्धचा अंतिम सामना पाकिस्तानमध्ये खेळला होता. यानंतर भारताने पाकिस्तानाच दौरा केला नाही. पण आता चॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्घाटन सोहळा जर पाकिस्तानात आयोजित केला तर भारत सरकार आणि बीसीसीआय रोहित शर्माला पाकिस्तानमध्ये पाठवण्यासाठी काय निर्णय घेणार, यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा ८ संघांमध्ये हायब्रिड मॉडेलअंतर्गत होणार आहे. ज्यामध्ये भारताचे सर्व सामने हे दुबईत खेळवले जाणार आहेत. याशिवाय भारतीय संघ सेमीफायनल आणि फायनलमध्ये पोहोचला तर ते सामनेदेखील दुबईत होतील. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ८ संघांची २ गटात विभागणी केली आहे. अ गटात भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. तर ब गटात अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ आहेत.