Why Shah Rukh Khan banned from Wankhede stadium for 5 years: मुंबईच्या क्रिकेट पंढरीतील वानखेडे स्टेडियम उद्या म्हणजेच १९ जानेवारी २०२५ ला ५० वर्षांचं होणार आहे. या पन्नाशीनिमित्त अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजन मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून करण्यात आलं आहे. वानखेडे गेल्या ५० वर्षात अनेक विविध प्रसंग, घटना, आनंदाचे क्षण, विक्रम आणि अगदी वादविवादांचाही साक्षीदार राहिला आहे. या वादांमधील सर्वात गाजलेला प्रसंग म्हणजे शाहरूख खानचा आयपीएलमधील वाद आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याच्यावर घातलेली ५ वर्षांची बंदी.
आयपीएल २०१२ दरम्यान कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सहमालक शाहरुख खानला वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास ५ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. आयपीएल २०१२ म्हणजे आयपीएलचा ५वा सीझन. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. वानखेडे स्टेडियम हे मुंबई इंडियन्सचे होम ग्राउंड आहे. सामना संपल्यानंतर शाहरुख खान आपली मुलगी सुहाना आणि त्याच्या मित्रांसह मैदानात उतरताना दिसला.
शाहरूख खानने कोणाला केली होती शिवीगाळ?
शाहरूखला मैदानावर उतरताना पाहून एका वृद्ध सुरक्षा कर्मचाऱ्याने त्यांना जाण्यापासून रोखले. सुरक्षा कर्मचाऱ्याने त्याला थांबवल्यामुळे शाहरूख संतापला आणि सुरक्षा रक्षकाशी त्याची हाणामारी झाली. तसेच शाहरूखने त्याला शिवीगाळ देखील केली होती. परिणामी, मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) शाहरुखला पुढील पाच वर्षांसाठी स्टेडियमच्या परिसरात जाण्यास बंदी घातली. शाहरुखने आपल्यावर ही बंदी घातली जाऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु ते सगळे फेल ठरले.
शाहरूख खानने वानखेडे स्टेडियमवर नेमका काय गोंधळ घातला होता?
एमसीएचे तत्कालीन अध्यक्ष विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्कालीन बैठकीत एमसीएच्या व्यवस्थापकीय समितीने शाहरूख खानवर ५ वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. “एमसीएच्या व्यवस्थापकीय समितीने आजच्या बैठकीत शाहरुख खानच्या वर्तनाचा निषेध केला, ज्याने एमसीए अधिकाऱ्यांनाही शिवीगाळ केली आणि बीसीसीआय-आयपीएल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरक्षा रक्षकाला मारहाण केली,” असं देशमुख २०१२ मध्ये शाहरूखच्या वागण्याबाबत निर्णय सुनावताना म्हटले.
“शाहरुखला त्याच्या कृत्याबद्दल आणि चुकीच्या वागण्याचा कोणताही पश्चाताप नव्हता. सुरक्षा रक्षकाला मारहाण करणं आणि एमसीए अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणं आणि धमकावणं या त्याच्या कृतीचे त्याने समर्थन केलं आहे. व्यवस्थापकीय समितीने शाहरुख खानला पाच वर्षांसाठी वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे,” असं पुढे देशमुख म्हणाले.
शाहरूख खानने माफी मागितल्यास एमसीएच्या भूमिकेत काही बदल होईल का, असे विचारले असता देशमुख म्हणाले की, हा प्रश्नच उद्भवत नाही. “५ वर्षांची बंदी हा प्रत्येकासाठी संदेश आहे की जर कोणी असं वागलं तर कारवाई केली जाईल.” वानखेडे स्टेडियमवर सामन्यानंतर जेव्हा ही अप्रिय घटना घडली तेव्हा एमसीएच्या व्यवस्थापकीय समितीमधील ५० टक्क्यांहून अधिक सदस्य उपस्थित होते.
अभिनेता शाहरुख खानने मुंबईतील वानखेडे स्टेडिममधील सुरक्षारक्षकांना शिवीगाळ केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र नंतर या प्रकरणात त्याला क्लीन चिट मिळाली. ‘मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट’ म्हणजेच महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पोलिसांचा अहवाल सादर केल्यानंतर शाहरुखने शिवीगाळ केल्याचा कोणताही पुरावा नसल्यामुळे त्याला या प्रकरणातून क्लीनचीट देण्यात आली.
या प्रकरणानंतर या साऱ्या गोष्टींचा शाहरुखने इन्कार केला होता. स्टेडियममधील सुरक्षारक्षकांनी माझ्या मुलांसह काही मुलांना चांगली वागणूक न दिल्याचा आरोप शाहरुखने केला होता. शाहरुखने खुलासा दिल्यानंतरही एमसीएने आपली भूमिका ठाम ठेवली होती.
हेही वाचा – Wankhede Stadium : वानखेडेवर सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या टॉप-५ खेळाडूंपैकी पहिले तीन आहेत ‘हे’ मुंबईकर
शाहरूख खानने या प्रकरणानंतर रजत शर्मा यांच्या आपकी अदालतमध्ये या प्रकरणाबाबत वक्तव्य केलं होतं. शाहरूख म्हणाला होता की, हा १७ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर मला खूप राग आला होता. याची मलाही खूप लाज वाटते. कारण माझी मुलं तिथे होती आणि मला वाटलं की अनेक गोष्टी वर-खाली झाल्या आहेत, त्यावर खूप चर्चाही झाली. पण सत्य हे आहे की मला असं वाटलं आमच्या मुलांशी फक्त गैरवर्तन केले नाही तर उद्धटपणे वागल (हाकला इथून यांना). म्हणून आम्ही म्हणालो – मुलं आमची आहेत, आम्ही घेऊन जात आहोत.
शाहरूख पुढे म्हणाला, ‘एक माणूस तिथे होता त्याने असा शब्द वापरला होता की मी दिल्लीचा असल्याने मला तो शब्द अपमानास्पद वाटला. मराठीतही तो शब्द वाईट होता. मला त्या शब्दाचा अर्थ सांगितल्यावर मी संतापलो. मग मी त्यांना मारायला गेलो. मी त्याला मारू शकलो नाही कारण तिथल्या पोलिसांनी मला सांगितलं की मारहाण केलीस तर तुला तुरुंगात टाकेन.
शाहरूखने पुढे सांगितलं, ‘म्हणून मी फक्त मारेन असा अभिनय करत होतो. दिल्लीत आम्ही असा अभिनय खूपदा केलं आहे. पण ही खरोखरच खूप लाजिरवाणी गोष्ट होती. मी सगळ्यांना घरी बोलावून माफी मागितली होती. आता कदाचित मी अशी व्यक्ती झालो आहे की माझ्या कृतीचा इतर लोकांवर परिणाम होऊ शकतो. तर मी असं वागायला नको होतं. वडील म्हणून मी काही चूक केली असं मला वाटत नाही. मी मॅच पाहण्यासाठी ४० मुलांना घेऊन गेलो होतो. हे सर्व प्रकरण टीव्हीवर दिसलं होतं, जे खूपच वाईट होतं.”
मुंबई क्रिकेट असोसिएशनने कालांतराने अभिनेता शाहरुख खानवरील पाच वर्षांची बंदी तीन वर्षांनंतरच उठवण्याचा निर्णय घेतला. ‘‘जेव्हा गरज होती तेव्हा एमसीएने त्याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. पण ही बंदी आणखी पुढे कायम ठेवण्याचा एमसीएच्या कार्यकारिणीचा मानस नाही. त्यामुळे एमसीएने त्याच्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असं एमसीएचे तत्कालीन उपाध्यक्ष आशिष शेलार २०१५ मध्ये म्हणाले.