Wankhede Pitch Digging by Shiv Sainiks in 1991: मुंबईला मायानगरी म्हटलं जातं आणि मायानगरीतील सर्वच जण क्रिकेटवर अपार प्रेम करतात. मुंबई ही क्रिकेटची पंढरी असं म्हटलं जातं आणि मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे तर मुंबईत वसलेलं हे वानखेडे स्टेडियम पवित्र गाभारा आहे. या वानखेडे स्टेडियमने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. गेली ५० वर्ष वानखेडे स्टेडियमने भारतीय क्रिकेटच नाही तर मुंबईच्या इतिहासाचंही हे मैदान साक्षीदार बनलं आहे. या मैदानाने असे कैक प्रसंग पाहिले आहेत. पण त्यातील एक अनोखी घटना म्हणजे १९९१ मध्ये शिवसैनिकांनी वानखेडेचं पिच खोदलं होतं. ही घटना नेमकी काय आहे, जाणून घेऊया.
वानखेडे स्टेडियमवर अनेक अविस्मरणीय सामने, क्षण अनुभवायला मिळाले आहेत. पण १९९१ मध्ये ही वास्तू एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत होती. १९९१ च्या दरम्यान शिवसेनेची सातत्याने हिच मागणी होती की जोपर्यंत पाकिस्तान आपले दहशतवादी पराक्रम करणं सोडत नाही, तोपर्यंत पाकिस्तान क्रिकेट संघाला भारतात खेळण्याची संधी दिली नाही पाहिजे. यासाठी शिवसैनिकांनी दिल्ली आणि मोहालीसारख्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शन केली होती, पण मुंबईतील प्रकरण मात्र गाजलं होतं.
१९९१ मध्ये भारत वि पाकिस्तान मालिका आयोजित केली होती, त्या मालिकेतील एक सामना हा वानखेडेमध्ये होणार होता. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी एक इशारा दिला आणि शिशिर शिंदे व त्यांचे शिवसैनिक सज्ज झाले. खेळाडूंचा वेश धारण करून ते वानखेडेमध्ये शिरले आणि त्यांनी पिच उद्धवस्त करून टाकलं.
ठाकरे यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी शिशिर शिंदे यांनी शिवसैनिकांचा एक गट तयार केला आणि सामना थांबवण्यासाठी वानखेडेची खेळपट्टी खोदण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे कुऱ्हाडी, लोखंडी रॉड आणि इंजिन ऑइलने भरलेले डबे होते. शिवसैनिकांनी खेळपट्टी खोदून त्यावर इंजिन ऑईल टाकलं, जेणेकरून खेळपट्टी पूर्ण खराब होईल.
ऑक्टोबर २०१५ मध्ये टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना शिशिर शिंदे म्हणाले होते, “बाळासाहेब (ठाकरे) यांनी १९ ऑक्टोबर १९९१ रोजी घोषणा केली होती की, पाकिस्तानची आमच्या देशाप्रती आक्रमक भूमिका पाहता शिवसेना मुंबईत भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होऊ देणार नाही. बाळासाहेबांच्या या निर्णयाला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी विरोध केला होता. शिवसेनेचा विरोध असतानाही हा सामना वानखेडेवरच होणार असल्याचे नाईक म्हणाले होते.”
वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उत्तरार्धात १९ जानेवारीस मुख्य कार्यक्रम होणार असून, त्या वेळे आणखी वलयांकित खेळाडूंच्या उपस्थितीने मैदान उजळून निघेल. वानखेडे स्टेडियमने भारतीय क्रिकेटला खूप काही दिलं आहे. रविवारी १२ जानेवारीला मैदानाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाच्या पूर्वार्धात तारांकित खेळाडूंच्या उपस्थितीने झाली. मिलिंद रेगे, लालचंद राजपूत, शिशिर हट्टंगडी अशा आठवणींच्या कप्प्यात राहिलेल्या खेळाडूंपासून आजही क्रिकेटशी नाळ जोडून राहिलेल्या सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, वसिम जाफर यांच्या उपस्थितीने क्रिकेटची पंढरी मानले गेलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियम दुमदुमून गेले होते.