India vs West Indies 2nd ODI Match Updates: यंदा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. या विश्वचषक स्पर्धेला ५ ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे स्पर्धेच्या तयारीसाठी टीम इंडियाकडे जास्त वेळ शिल्लक नाही, अशावेळी टीम इंडियाला आपल्या सर्व उणीवा दूर करायच्या आहेत. सूर्यकुमार यादवचा फॉर्म सध्या टीम इंडियासाठी मोठी समस्या आहे. मधल्या फळीत खेळत असलेल्या सूर्याची बॅट गेल्या काही डावांत शांत दिसली आहे.
तसेच टीम इंडियात त्याचा पर्याय असलेल्या संजू सॅमसन संधी देण्याची मागणी सातत्याने होत आहे. कारण त्याची गेल्या १० डावांमध्ये फलंदाजीतील सरासरी खूपच प्रभावी आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादव फक्त १९ धावा करू शकला. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या वनडे मालिकेत खेळल्या गेलेल्या तीनही सामन्यांमध्ये त्याला खातेही उघडता आले नव्हते. सूर्याच्या शेवटच्या १० एकदिवसीय डावातील फलंदाजीतील सर्वोच्च धावसंख्या नाबाद 34 होती. सूर्यकुमारची गेल्या १० डावांमध्ये सरासरी १२.४४ इतकीच आहे.
दुसरीकडे, संजू सॅमसनचा शेवटच्या १० एकदिवसीय डावातील आकडेवारी पाहता त्याची सरासरी ६६ राहिली आहे. यादरम्यान सॅमसनने दोन अर्धशतकांच्या खेळीसह पाच वेळा नाबाद परतला आहे. अशा स्थितीत कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना सूर्याच्या संघातील स्थानाबाबत लवकर निर्णय घ्यावा लागेल.
हेही वाचा – ENG vs AUS 5th test: ‘कोहली असता तर…’, स्मिथला नॉटआऊट घोषित केल्यानंतर अंपायर नितीन मेनन होतोय ट्रोल
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावर खिळल्या सर्वांच्या नजरा –
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसनला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात तरी सॅमसनला संधी मिळणार की नाही, हे पाहावे लागेल. तसेच सूर्यकुमार यादव पहिल्या डावात मिळालेल्या संधीचे सोनं करु शकला नव्हता. कारण त्याला फक्त १९ धावा करता आल्या होत्या. अशा त्याच्यावर पुन्हाा एकदा विश्वास दाखवला जाईल का? हेही पाहावे लागेल. सूर्याला या संधीचा फायदा उठवता आला नाही, तर त्याला आशिया चषक आणि विश्वचषक संघात स्थान मिळवणे कठीण होऊ शकते.