Why Yograj Singh Hates Dhoni, Kapil Dev: भारताचा तडाखेबाज माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग हे कायम एमएस धोनीला बोल लावत असल्याचे दिसतात. अलीकडे त्यांनी धोनीसह १९८३ साली भारताला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकून देणाऱ्या कपिल देव यांच्याविरोधातही मोर्चा उघडला आहे. कपिल देव आणि एमएस धोनी यांच्याबद्दल योगराज सिंग यांच्या मनात इतका तिरस्कार का भरला आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. वास्तविक आपला मुलगा युवराज सिंग याची कारकिर्द धोनीमुळे लयास गेली, हा त्यांचा जुनाच आरोप आहे. मात्र युवराज सिंग याने कधीही याबाबत अवाक्षर काढलेले नाही. उलट तो आणि धोनी एकमेकांचे मित्र आहेत. तरीही कपिल देव आणि धोनी यांचा द्वेष करण्याचे कारण काय? तर या दोघांमुळे बापलेकाची कारकिर्द उध्वस्त झाली, असा योगराज सिंग यांचा आरोप आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कपिल देव यांच्यावरील आरोप काय?

योगराज सिंग आणि कपिल देव या दोघांनीही १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात आपल्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीला सुरुवात केली. त्यानंतर फेब्रुवारी १९८१ मध्ये योगराज सिंग यांनी भारत वि. न्यूझीलंड यांच्यादरम्यान झालेला एकच कसोटी सामना खेळला. त्यानंतर १९८३ रोजी कपिल देवकडे भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व देण्यात आले. तेव्हापासून योगराज सिंग हे कपिल देव यांच्यावर टीका करत आहेत. कपिल देव यांच्यामुळेच त्यांना संघातून बाद करण्यात आले, असा सिंग यांचा आरोप आहे.

हे वाचा >> Yograj Singh on Kapil Dev: “मी कपिल देवला सांगितलेलं, तुझी अशी अवस्था करेन…”, युवराजचे वडिल योगराज सिंगांचं धक्कादायक वक्तव्य

एकच कसोटी सामन्या व्यतिरिक्त योगराज सिंग यांनी सहा एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. योगराज सिंग यांनी आपल्या ताज्या आरोपात कपिल देवच्या यशाची तुलना आपला मुलगा युवराज सिंग याच्याशी केली असून कपिल देवच्या योगदानाला कमी लेखन्याचा प्रयत्न केला आहे. योगराज सिंग म्हणाले, “कपिल देव आमच्या काळातील सर्वात महान कर्णधार होता. मी त्याला सांगितले होते की, तुझी अशी अवस्था होईल की सारे जग तुला वाईट बोलेल. आज युवराज सिंगकडे १३ चषक आहेत आणि तुझ्याकडे फक्त एकच विश्वचषक आहे.”

धोनीवर आरोप काय?

योगराज सिंग यांनी झी स्विचला नुकतीच एक मुलाखत दिली. यावेळी त्यांनी कपिल देव यांच्यासह एमएस धोनीवरही पुन्हा एकदा आरोप केले. योगराज सिंग म्हणाले, “मी एमएस धोनीला कधीही माफ करणार नाही. त्याच्यामुळेच माझ्या मुलाला भारतीय संघातून बाहेर पडावे लागले.” युवराज सिंगने २००७ चा टी-२० विश्वचषक आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले होते. हे दोन्ही विश्वचषक धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकले गेले. त्यानंतर धोनीने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

२०१५ च्या एकदिवसीय विश्वचषकात धोनीमुळेच युवराज सिंगचा संघात समावेश होऊ शकला नाही. तसेच धोनीमुळे भारताचा त्यावेळच्या विश्वचषकात उपांत्य फेरीत पराभव झाला, असाही दावा त्यांनी केला आहे. तसेच २०१९ च्या विश्वचषकातही भारताचा उपांत्य फेरीत पराभव होण्यासाठी योगराज सिंग यांनी धोनीलाच जबाबदार ठरविले होते.

हे ही वाचा >> Yograj Singh on MS Dhoni : ‘धोनीने आरशात तोंड पाहावे…’, योगराज सिंगांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, ‘युवराजला भारतरत्न द्यावा…’

योगराज सिंग पुढे म्हणाले, “मी धोनीला कधीही माफ करू शकत नाही. त्याने स्वत:चा चेहरा आरशात पाहावा. तो एक महान क्रिकेटर आहे, पण त्याने माझ्या मुलाच्या विरोधात काय केले आहे, ते आता समोर येत आहे. यासाठी त्याला कधीच माफ करता येणार नाही. मी माझ्या आयुष्यात दोन गोष्टी कधीच केल्या नाहीत – पहिली, माझ्यावर अन्याय करणाऱ्याला मी कधीच माफ केले नाही. दुसरे, मी कधीही त्यांना मिठी मारली नाही, जरी तो माझ्या कुटुंबाचा किंवा माझ्या मुलांचा मित्र असला तरीही. धोनीने माझ्या मुलाची कारकीर्द उध्वस्त केली नसती तर तो आणखी पाच वर्ष क्रिकेट खेळू शकला असता.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why yuvraj singh father yograj singh hates too much kapil dev and ms dhoni reason came out kvg