WI vs ENG 1st T20, Andre Russell: एकदिवसीय मालिकेतील खराब कामगिरीनंतर टी-२०मध्येही इंग्लंड संघाची खराब कामगिरी कायम आहे. बार्बाडोसमध्ये खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने इंग्लंडचा चार विकेट्स राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ १९.३ षटकांत सर्वबाद १७१ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने १८.१ षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले.
दोन वर्षांनंतर वेस्ट इंडिज संघात पुनरागमन करणाऱ्या आंद्रे रसेलने या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. उत्कृष्ट गोलंदाजीबरोबरच त्याने विस्फोटक खेळीही खेळली. त्याने या मालिकेत जेरोम टेलरचा कमी धावांत जास्त विकेट्स टी-२० मधील विक्रम मोडला. या दोन्ही संघामधील या मालिकेतील दुसरा सामना १४ डिसेंबर रोजी ग्रेनाडा येथे होणार आहे. याआधी एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजने इंग्लंडचा ३-१ असा पराभव केला होता.
इंग्लंडचा डाव
पहिल्या टी-२० मध्ये वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिलिप सॉल्ट आणि कर्णधार जोस बटलर यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली. इंग्लिश संघाला पहिला धक्का फिलिप सॉल्टच्या रूपाने बसला. त्याला हेटमायरच्या हाती रसेलने झेलबाद केले. त्याला २० चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४० धावा करता आल्या. विल जॅक नऊ चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने १७ धावा करून बाद झाला. बेन डकेटने १४ धावा केल्या, हॅरी ब्रूक एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.
कॅप्टन बटलरला अकेल होसेनने झेलबाद केले. तो ३१ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. लियाम लिव्हिंगस्टोनने १९ चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २७ धावांची खेळी केली. सॅम करन १३ धावा करून बाद झाला, तर रेहान अहमद एक धावा काढून बाद झाला. आदिल रशीद आणि टायमल मिल्स यांना खातेही उघडता आले नाही. वेस्ट इंडिजकडून रसेल आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. तर रोमारियो शेफर्डने दोन गडी बाद केले. अकेल होसेन आणि जेसन होल्डरला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
वेस्ट इंडिजचा डाव
१७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला पहिला धक्का ब्रँडन किंगच्या रूपाने बसला. १२ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २२ धावा करून तो बाद झाला. तर, काइल मायर्सने २१ चेंडूंत चार षटकारांसह ३५ धावांची खेळी केली. शाई होपने ३० चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३६ धावांची खेळी केली. निकोलस पूरनला १२ चेंडूत १३ धावा करता आल्या. कर्णधार रोव्हमन पॉवेल १५ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ३१ धावा आणि आंद्रे रसेल १४ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद २९ धावा करून नाबाद राहिला. इंग्लंडकडून वोक्सने एक विकेट घेतली. तर रेहान अहमदने तीन आणि लिव्हिंगस्टोनने दोन गडी बाद केले.
रसेल दोन वर्षांनी पुनरागमन करत आहे
३५ वर्षीय अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलचे दोन वर्षांनंतर टी-२० आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे. या कॅरेबियन हिटमॅनने २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध या मालिकेपूर्वी शेवटचा टी-२० सामना खेळला होता. रसेल हा जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानला जातो. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना रसेलने अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत. यात १३ चेंडूत ४८ धावांच्या नाबाद खेळीचा समावेश आहे.
याशिवाय ३६ चेंडूत ८८ धावा ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम खेळी आहे. त्याने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्रिनबागो नाइट रायडर्ससाठी ४० चेंडूत शतक झळकावले आहे. त्यानंतर त्याने ४९ चेंडूत १२१ धावांची नाबाद शतकी खेळी खेळली. जमैका तल्लावाहविरुद्धच्या सामन्यात रसेलने हॅटट्रिकही घेतली होती. रसेलच्या आगमनाने पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी कॅरेबियन संघ मजबूत होऊ शकतो.